Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

गंगाधर स्वरोत्सव – यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाने रसिक तालमुग्ध

पुणे : ‘स्वरनिनाद’तर्फे आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सव’ला यशवंत वैष्णव यांच्या बहारदार तबला वादनाने सुरुवात झाली. मुक्तांगण बालरंजन केंद्रसहकारनगर येथे हा कार्यक्रम होत असून तीन दिवस संगीत क्षेत्रातील कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष असून याआधी अनेक दिग्गज कलाकारांनी या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उस्ताद बिस्मिल्लाह खान पुरस्कार विजेते तबलावादक, पंडित योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव यांनी तबलावादन केले. वैष्णव यांनी आपल्या गुरुजींच्या, उस्ताद फिरोज खाँ साहेब, उस्ताद अलारखाँ साहेब, बाबा मलंग यांच्या रचना सादर करून कायदे, तुकडे आणि वैविध्यपूर्ण तिहायानी रसिकांना तालमुग्ध केले. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथ केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक, भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे शिष्य आनंद भाटे यांनी आपल्या गायनशैलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गंगाधर पिंपळखरे यांची आठवण सांगत त्यांनी ‘राग यमन कल्याण’ने गायनाला सुरुवात केली. यात त्यांनी ‘अवगुन न किजे गुनी संग ’, ‘सखी येरी आली पिया बिन’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर ‘राग बहार’मधील ‘कलीयन संग करता रंग’ ही बंदिश त्यांनी गायली. ‘का करु सजनी’ ही ‘ठुमरी’ सादर करून त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. ‘जमुना के तीर’ या ‘भैरवी’ने त्यांनी पहिल्या दिवसाची सांगता केली. त्यांना साथसंगत भरत कामत (तबला) सुयोग कुंडलकर (संवादिनी), ललित देशपांडे (तानपुरा) , शार्दुल काणे (तानपुरा) यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading