किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांची भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरांजली
पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिवादन’ या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांना स्वरांजली अर्पण केली. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सदर कार्यक्रम पार पडला.
भारत सरकारने नुकताच डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण देत सन्मान केला त्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. प्रभा अत्रे यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मिलिंद देशपांडे व प्रभाकर देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.
हा सत्कार माझा नाही तर किराणा घराण्याचा, माझे आई वडील, गुरू आणि श्रोत्यांचा सत्कार आहे असे सांगत डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, “पंडित बिरजू महाराज, भारतरत्न लता मंगेशकर अशी अनेक चांगली माणसे या काळात गेली. त्यांची पोकळी भरून निघणारी नाही. मात्र त्यांचे स्वर आणि आठवणी आपल्या सोबत कायम असतील. त्याच घेऊन आता जगायचं आहे. वयाची नव्वदी आल्यावर आता एका ठिकाणी बसून गाणं अवघड होतं. अनेकदा जे मनात असतं ते मनातच रहातं. माझे गाणे गोड मानून घ्या. ही माझी सेवा आणि पूजा आहे.”
राग अपूर्व कल्याणने डॉ प्रभा अत्रे यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. अपूर्व कल्याणमध्ये शुद्ध प्रयोगात ‘मा जगदंब…’ ही रचना त्यांनी प्रस्तुत केली. त्यानंतर त्यांनी तराणा सादर केला. ‘मोरे सैया…’ हा भैरवी मधला दादरा त्यांनी गायला. ‘जगत जननी भव तारिणी…’ या देवीच्या भजनाने त्यांनी समारोप केला. त्यांना माधव मोडक (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), आरती ठाकूर- कुंडलकर, अश्विनी मोडक, चेतना बगावत (तानपुरा व गायनसाथ) तर ह्युमी नगेशी (स्वरमंडल) यांनी साथसंगत केली.
याआधी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांनी आपल्या गुरुंना वंदन करीत गायनसेवा सादर केली. मुलतानी रागातील ‘गोकुल गांव का छोरा’ या विलंबित एकतालातील बंदिशीने त्यांनी मैफलीस सुरुवात केली. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ‘कंगन मुंदरिया मोरी…’ ही तीन तालातील बंदिश त्यांनी सादर केली. यानंतर ‘जादू भरेली कौन अलबेली के नैना रसिले…’ ही किराणा घराण्याची प्रसिद्ध ठुमरी त्यांनी प्रस्तुत केली. भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी एकत्रित गायलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बाजे मुरलीया बाजे…’ या भजनाने आनंद भाटे यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अभयसिंह वाघचौरे व ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर पं. भीमसेन जोशी यांच्या जुन्या मैफलींची दुर्मिळ ध्वनिचित्रफीत दाखवीत ‘अभिवादन‘ या कार्यक्रमाचा समारोप करण्यात झाला. ३१ डिसेंबर १९९९ रोजी मॉडेल कॉलनीतील टोयोटा शो रुमच्या उद्घाटन वेळी झालेल्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीचे हे रेकॉर्डिंग असून सदर ध्वनीचित्रफीत ही निवेदक आनंद देशमुख यांच्या संग्रहातील आहे. पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली दोन नाट्यगीते या रेकॉर्डिंग मधील होती.
श्रीनिवास जोशी यांनी अभिवादन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

It’s a great event. Congratulations