PMPML – भोसरी ते जुन्नर नवीन बसमार्ग सुरू
पुणे : पीएमपीएमएल कडून आज पासून मार्ग क्रमांक ३५६ भोसरी ते जुन्नर हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे देशभरातून पर्यटक येतात. भोसरी ते जुन्नर (किल्ले शिवनेरी) या बस सेवेमुळे पर्यटक, नोकरदार, कामगार, विद्यार्थी यांची चांगली सोय होणार आहे.
आमदार महेश लांडगे, आमदार अतुल बेनके, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, पीएमपीएमएल चे संचालक प्रकाश ढोरे, जिल्हा परिषद सदस्या व विरोधी पक्षनेत्या आशा बुचके आदी मान्यवरांनी ही बससेवा सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच भोसरी ते जुन्नर मार्गावरील कुमशेत गावचे सरपंच रविंद्र डोके, सत्यवान डोके यांचेसह अनेक ग्रामपंचायती व सामाजिक कार्यकर्ते यांनी सदरच्या बससेवेसाठी पाठपुरावा केला. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी लोकप्रतिनिधींची मागणी व नागरिकांची गरज लक्षात घेऊन सदरचा बसमार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. किल्ले शिवनेरी पायथ्याजवळ पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, आशा बुचके, कामगार नेते सचिन लांडगे, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून या बसमार्गाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरामध्ये जुन्नर एसटी स्थानकापर्यंत बसची मिरवणूक काढण्यात आली. फुलांची आकर्षक सजावट केलेली पीएमपीएमएलची बस सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शिवभक्त व नागरिकांनी सदरची बस सेवा सुरु झाल्याचा आनंद लाडू वाटून साजरा केला.
मार्ग क्रमांक ३५६ – भोसरी ते जुन्नर या बससेवेचा मार्ग भोसरी, मोशी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, जुन्नर असा असणार आहे. सध्या या मार्गावर ३ बसेस द्वारे साधारणपणे दर ३ तासांनी बससेवा उपलब्ध असेल. भोसरी ते जुन्नर एकूण १० फेऱ्या होणार आहेत. भोसरी ते जुन्नर पहिली बस सकाळी ५.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.३५ वा. आहे. तसेच मुक्कामी असणारी जुन्नरहून भोसरीसाठी सुटणारी पहिली बस सकाळी ६.३० वा. सुटेल तर जुन्नर ते भोसरी शेवटची बस रात्री ९.०० वा. आहे. सदरच्या बस लोकार्पण सोहळ्यास जुन्नर तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह शिवभक्त व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
