fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे मनपाच्या आरोग्य विभागात डॉक्टर भरती करताना होतोय दुजाभाव, वशिलेबाजी – आम आदमी पक्ष

पुणे:  महानगरपालिकेची डॉक्टर भरती भ्रष्ट कारभाराच्या जंजाळामध्ये अडकली आहे. डॉक्टर भरती करून आरोग्य व्यवस्था सुधारणे ऐवजी वशिल्याचे लोक या भरतीमध्ये कसे घुसवता येतील आणि त्यासाठी चालू असलेली भरती प्रक्रिया प्रचंड काळ लांबवत ठेवून योग्य उमेदवारांना कसे डावलता येईल याचं कुटील राजकारण पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये चालू आहे. अपुऱ्या डॉक्टर भरतीचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे. महानगरपालिकेत बोगस अभियंते राजरोसपणे काम करत पुणे मनपाची, पुणेकरांची फसवणूक करत असताना उच्च विद्याविभूषित डॉक्टरांना मात्र पात्र ठरवून देखील नेमणूक पत्र देण्यात येत नाही. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासाठी ही शोकांतिका आहे.

एका बाजूला पुणे महानगरपालिका दावा करते की आम्हाला हवे असलेले पात्र डॉक्टर भेटत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पात्र डॉक्टरांनी अर्ज करून देखील त्यांची भरती दीड ते दोन वर्षे केली जात नाही. त्याचवेळी आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी डॉ योगिता रामचंद्र गोसावी यांची नेमणूक मात्र प्राधान्याने पार पाडली जाते. शासकीय आदेशानुसार एकाच विभागात एक वरिष्ठ व एक कनिष्ठ पदावर पती – पत्नी असू शकत नाही. तो आदेश डावलून त्यांची नियुक्ती करण्यात आली पण जे नियमात आहे त्यांना मात्र नियुक्ती देण्यात आली नाही.

पुणे महापालिकेमार्फत आरोग्य विभागात वर्ग 1 च्या 120 व वर्ग 2 च्या 57 अशा एकूण 32 संवर्गाच्या 177 डाॅक्टरांची/वैद्यकीय अधिकारी पदांची कायम आस्थापनेवरील सरळसेवा भरतीची जाहीरात दि 17 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्ध झाली होती. सदर पदांकरीता अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सन 2020 च्या मे महिन्यात कागदपत्रांच्या छाननीकरीता उमेदवारांना बोलावण्यात आलेले होते.

तदनंतर सदर पदांच्या प्रारूप यादी जुलै 2020 मधे प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. सदर प्रारूप यादीवर काही हरकती असल्यास 2 दिवसांत आॅनलाईन हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. परंतु, जाहिरातीतील 177 पदांपैकी फक्त 81 उमेदवारांना पदस्थापना मिळालेली आहे, अजूनही 96 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यातील 3 संवर्गाच्या म्हणजेच दंतशल्यचिकित्सक – (6 पदे), भौतिकोपचार तज्ञ- (9 पदे), आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी (9 पदे) एकूण 24 पदांच्या प्रारुप यादी बनवून देखील गेली दीड वर्षे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मागील दीड वर्षापासून या तीन संवर्गाची निवड प्रक्रिया का पूर्ण झालेली नाही?

एक विशेष बब म्हणजे आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी डॉ योगिता रामचंद्र गोसावी या मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांच्या संवर्गाची प्रारुप यादी दिनांक १७/१२/२०२० रोजी जावक क्रमांक अतिमआ/साप्रवि/आस्था/६४८३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली. या संवर्गाची अंतिम यादी दिनांक २०/०४/२०२१ रोजी जावक क्रमांक अतिमआ/ आस्था/साप्रवि/४८८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आणि नेमणूक पत्र देण्यात आले. आरोग्य प्रमुखांच्या पत्नी असलेल्या संवर्गाच्या नेमणुका करण्यासाठी आरोग्य प्रमुखांनी दाखवलेली तत्परता इतर संवर्गासाठी का दाखवली गेली नाही?

आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी संवर्गाची प्रारुप यादी दिनांक ०८/०७ /२०२० रोजी जावक क्रमांक अतिमआ/साप्रवि/आस्था/२२७८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली. पण अद्यापही या संवर्गाची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही. भौतिकोपचार तज्ञ संवर्गाची प्रारुप यादी दिनांक १२/०४ /२०२१ रोजी जावक क्रमांक अतिमआ/साप्रवि/आस्था/२९३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली. पण अद्यापही या संवर्गाची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही. दंतशल्यचिकित्सक संवर्गाची प्रारुप यादी दिनांक १२/०४ /२०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पण अद्यापही या संवर्गाची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही. सदर प्रारूप यादीवर काही हरकती असल्यास २ दिवसांत आॅनलाईन हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. प्रारुप यादीवर आलेल्या हरकतीवर सुनवाई करुन यादी अंतिम करायला कोविड संकटकाळात जास्तीत जास्त एक आठवडा ते एक महिना अवधी लागणे अपेक्षित असताना या संवर्गाच्या याद्या एक ते दीड वर्षे प्रलंबित ठेवलेल्या आहेत.

आम आदमी पक्ष मागणी करत आहे की- आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत होणारी वशिलेबाजी, विलंब याची चौकशी व्हावी आणि पात्र डॉक्टरांना विनाविलंब नेमणूक पत्र देण्यात यावे. अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत आपचे प्रवक्ते डॉक्टर अभिजित मोरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading