राज्यात काही भागात येत्या दोन दिवसात अवकाळी पाऊस पडणार
पुणे :सध्या राज्यात काही भागात थंडी आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आणि धुक्याचं साम्राज्य आहे. त्यामुळे येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत असंच वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
तर 3 फेब्रुवारीपासून वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता आहे, असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. थंडीची लाट असली तरी काही दिवसात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दिवसात राज्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 2 ते 4 फेब्रुवारीला अवकाळ पाऊस होऊ शकतो. अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी धास्तावला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरु आहे. राज्यातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा अजूनही निच्चांकी पातळीवर आहे. धुळ्यात 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे.
