जगातल्या मानवाच्या मुक्तीसाठी गांधींचा लढा होता – उल्हास पवार
पुणे : जगातल्या मानवाच्या मुक्तीसाठी गांधींचा लढा होता. सध्या केंद्रात सत्तेत असलेल्यांना गांधी पचवणे अवघड जाते. कितीही मारण्याच्या प्रयत्न केला तरीही गांधी हे अमर आहेत असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी मत व्यक्त केले.
निमित्त होते महात्मा गांधीजींच्या 74व्या हुतात्मा दिनानिमित्त पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटी, लोकायत, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, दलित स्वयंसेवक संघ आणि सर्व पुरोगामी पक्ष-संघटना आयोजित गांधी के कदमों पर या मौन पदयात्रेचे.
या पदयात्रेचे महात्मा गांधी पुतळा येथे आदरांजली सभेत रुपांतर झाले. ज्या पध्दतीने आपल्या भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक मूल्यांवर
सध्याचं केंद्रातल भाजप सरकार बदलवत आहे त्यात महात्मा गांधीचे विचार आठवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशी भावना महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस अभय छाजेड यांनी यावेळी व्यक्त केल्या.
म. गांधीजींनी आपल्या सर्वांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणदिनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपणही गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर काही पावले चालूया असे परखड मत लोकायतचे नीरज जैन यांनी केले. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे संतोष म्हस्के म्हणाले की मुस्लिम, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यकांवरील हल्ले रोखून एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी, जातीनिर्मूलनासाठी, स्त्रियांना माणूसपण मिळवून देण्यासाठी आपण लढल पाहिजे.
या पदयात्रेत सर्वांनी गांधी टोपीही परिधान केली. 5 वाजून 17 मिनिटांनी गांधीची हत्या झाली होती. त्या निमित्त मेणबत्ती लावून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. तसेच वैष्णव जन तो, अल्ला तेरो नाम हे भजनही गायले गेले.
यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी,अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हकक अध्यापक सभेचे शरद जावडेकर,मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर उपस्थित होते. शंकुतला भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.
