Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

 ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२’ साठी पुणे महानगरपालिका सज्ज

पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील शहरांसाठी आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२’ साठी पुणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. जनजागृतीच्या दृष्टीने विविध उपक्रम आणि नागरिकांसाठी विविध स्पर्धाचे आणि रेडिओच्या माध्यमातून स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून जोरकस प्रयत्न सुरू आहे. विविध माध्यमातून लोकसहभाग वाढावा आणि लोकसहभागातूनच जनजागृती व्हावी यासाठी आतापर्यंत काही स्वच्छ पुरस्कार अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन नागरिकांसाठी करण्यात आले होते. गीताच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिंगल स्पर्धा, चित्र किंवा कलेतून स्वच्छतेचा संदेश पोचविण्यासाठी आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी म्युरल स्पर्धा, पोस्टर/चित्रकला स्पर्धा, अभिनयातून स्वच्छतेचा प्रभावी संदेश पोचविण्यासाठी लघुपट निर्मिती आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

शहर स्वच्छतेत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, नवनवीन कल्पना समोर याव्यात या दृष्टीकोनातून स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेजअंतर्गत नागरिकांकडून चार विषयांवर संकल्पना मागविण्यात आल्या होत्या. सामाजिक सहभाग, शून्य इंप, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पारदर्शकता या विषयावर आयोजित स्पर्धेत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर संकल्पना प्राप्त झाल्या. या संकल्पनांचा वापर भविष्यात घनकचरा व्यवस्थापनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पुणे महानगरपालिकेअंतर्गत कार्य करणारे स्वच्छ कर्मचारी समुदाय संघटक, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेतर्फे अशा व्यक्तींना ‘स्वच्छ चॅम्पियन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चालता चालता आजूबाजूला पडलेला कचरा उचलून शहर स्वच्छतेत नागरिकांनी हातभार लावावा या संकल्पनेतून पुणे शहरात मा. महापौर मुरलीधर मोहोळ आणि मा. आयुक्त विक्रम कुमार यांच्या नेतृत्वात प्लॉगॅथॉनचे आयोजन करण्यात आले. पुणे शहरातील नागरिकांनी घरात निर्माण होणारा कचरा तेथेच विलग करून महानगरपालिकेकडे सोपवावा, यासाठी प्रभावीपणे जनजागृती मोहीम राबविली.

शासनातर्फे बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नयेयासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्याच्या हेतूने महानगरपालिकेने सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading