राष्ट्रवादीचे आंदोलन हे महाविकास आघाडीचे अपयश झाकण्यासाठीच – जगदीश मुळीक
पुणे : शहरासह समाविष्ट गावांमधील विकासकामांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला गेल्या दोन वर्षांत निधी उपलब्ध करून देता आलेला नाही. राज्य सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने महापालिकेत २३ गावांमधील पाणी पुरवठ्यासंदर्भात आंदोलन केल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
मुळीक म्हणाले, भाजपच्या वतीने पुणे महापालिकेच्या माध्यमांतून विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. नुकतीच समाविष्ट गावांत ३९२ कोटी रुपये खर्च करुन मैलापाणी शुद्धीकरणासाठी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांचा तिळपापड झाला आहे. समाविष्ट गावांत विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ९ हजार कोटी रुपयांची गरज आहे. तशी मागणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली होती. परंतु राज्य सरकारने पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली.
मुळीक म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे शहराच्या विकासाला खिळ बसली आहे. महापालिकेच्या माध्यमातून भाजप करीत असलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी वडगावशेरी मतदारसंघातील आमदार महापौरांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांचे पुन्हा भूमिपूजन करीत आहेत. भाजप नगरसेवकांच्या विकासनिधीतून करण्यात येणार्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची केविलवाणी धडपड शहराच्या सर्वच भागात चालू आहे.
मुळीक पुढे म्हणाले, समाविष्ट गावात जेथे गरज नाही अशा काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने त्यांच्या पातळीवर घेतला होता. सर्व गावातील टॅंकर बंद करण्यात आले नव्हते. आज याचा आढावा घेऊन, सरसकट टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी दिला आहे. या पूर्वी वर्षानुवर्षे बहुसंख्य समाविष्ट गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. परंतु या सत्ताकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेस मूलभूत सुविधा पुरवू शकली नाही. आता आपल्या अपयशाचे खापर भाजपवर फोडण्यासाठी राईचा पर्वत केला जात आहे.
