Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

रोजगार आणि आरोग्य सुविधांवर भर देण्याची गरज – चंद्रकांत पाटील 

पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कोरोना हेल्पलाईनचे उद्घाटन

पुणे : कोरोनाचा काळात आरोग्य सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचीबाब अधोरेखित झाली. त्यानंतर त्यावर भर देऊन उभारल्या गेल्या. पण आता रोजगार आणि आरोग्य सुविधांवर भर देऊन, त्या कायम राखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे शहर भाजपाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना हेल्पलाईनचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, राजेश येनपुरे, वैद्यकीय आघाडीच्या तेजस्विनी गोळे ,धनंजय जोशी, विजय वरूडकर ,चंद्रकांत पोटे आदींसह शहर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाचा प्रभाव कमी झाला तरी, त्याचे अंश राहणारच आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्दी, खोकला सारख्या आजारांना औषधोपचाराची गरज असते, त्याचप्रमाणे प्रभावहिन औषधोपचाराची गरज असणारच आहे. त्यामुळे हेल्पलाईनच्या माध्यमातून मोफत समुपदेशन करणे सोपे आहे. तसेच रुग्णांना मदत तात्काळ उपलब्ध करता येईल.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात अनेक आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागला. या आव्हानांवर मात करत, आपण कोरोनावर विजय मिळवला. पण तरीही या आव्हानांमध्ये आरोग्य व्यवस्था आणि रोजगार यावर नेहमीच लक्ष देण्याची गरज आहे.त्यासाठी वैद्यकीय आघाडीने अतिशय प्रभावीपणे काम केले पाहिजे. तसेच, नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी नेहमी तत्पर असले पाहिजे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, आज शहरात कोरोनाचा संसर्ग होत असताना, नागरिकांमध्ये ही काहीप्रमाणात भिती आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना औषधोपचार तात्काळ मिळावेत, आणि त्याला आराम मिळावा व तो लवकर कोरोनामुक्त व्हावा या भूमिकेतून भाजपाच्या वतीने कोरोना हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाबाधितास सर्वप्रकारची मदत मिळणार आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया असे ते म्हणाले.

माधुरी मिसाळ म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी लढत असताना, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत आहे. आजही कोरोना हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस गणेश घोष यांनी केले. तर डॉ. धनंजय जोशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading