Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

वक्तृत्वामध्ये तारतम्य आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

प्रा.मिलिंद जोशी लिखीत ‘कथा त्यांच्या वक्तृत्वाची’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणेः- महाराष्ट्राला वक्तृत्वाची दीर्घ परंपरा लाभलेली असून वक्तृत्व ही एक कला आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असतांना आम्हा राजकारण्यांना तर वक्तृत्वाचे कौशल्य खूपच आवश्यक असते. काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याचे भान आम्हाला बाळगावे लागते. वक्तृत्वामध्ये तारतम्य आवश्यक असते, असे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.

अक्षरधारा बुक गॅलरी तर्फे आयोजित कार्यक्रमात राजहंस प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा.मिलिंद जोशी लिखीत ‘कथा त्यांच्या वक्तृत्वाची’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष भारत सासणे, राजहंस प्रकाशन संस्थेचे संपादक डाॅ. सदानंद बोरसे, अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश आणि रसिका राठिवडेकर आदी उपस्थित होते.

डाॅ. नीलम गो-हे म्हणाल्या की, विधानसभा असो की विधान परिषद सर्व सभागृहांमध्ये अनेक प्रकारचे वक्ते आम्ही पहात असतो. सरकारचा निर्णय घडवून आणण्यापासून सभागृहात गोंधळ घालण्यापासून तर संदर्भासहित अभ्यासपूर्ण भाषण करणाऱ्यांपर्यंत सभागृहात अनेक वक्ते असतात. तसेच प्रसिद्धी माध्यमांचा संदर्भ लक्षात घेऊनही आम्हाला राजकीय आणि सामाजिक जीवनात व्यक्त व्हावे लागते. आचार्य प्र.के. अत्रे राम शेवाळकर, पु.ल.देशपांडे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या वक्तृत्व महामेरूंच्या वक्तृत्व शैलीचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. ही सर्व मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील वक्तृत्वाची हिमशिखरे होती. ही कला आत्मसात करण्यासाठी अनुभव, विश्लेषण आणि चिंतनाची जोड द्यावी लागते. वक्तृत्व हे जड भाषेने युक्त नसावे, तर निरूपणासारखे साधे सरळ आणि ओजस्वी असावे. कारण निरूपण हे वक्तृत्वाचे दुसरे अंग आहे.

प्रा.जोशी म्हणाले व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज् हानी होताना दिसत असली तरी नेटक्या बोलण्याचे महत्व कधीही कमी होणार नाहीं. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा , संस्कृती यांचे आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. वक्तृत्व ही शब्दांची आतषबाजी नाही, ती जीवनाची उपासना आहे. उत्तम तयारी आणि उस्फूर्तता यातूनच देखणे वक्तृत्वशिल्प आकाराला येते. वक्तृत्व हा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा अनेक प्रक्रियांचा संयुक्त खेळ आहे. पुढच्या पिढीतील वक्त्यांना आपली समृध्द वक्तृत्व परंपरा समजावी म्हणून हे पुस्तक लिहिले आहे.अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ लेखक भारत सासणे म्हणाले की, आपल्या लोकवाङ्मयाला दीर्घ मौखिक परंपरा लाभलेली आहे. बहिणाबाई हे त्याचे जाज्वल्य उदाहरण आहे. आज प्रकाशीत झालेले पुस्तक हे वक्तृत्व क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी संग्राह्य तर अभ्यासकांसाठी महत्त्वाचे संदर्भ पुस्तक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading