पीएमपीएमएल कडून हडपसर ते निरा नवीन बसमार्ग सुरू

पुणे : हडपसर ते निरा दरम्यान फुलांची व गुलालाची उधळण करून वाजतगाजत बससेवेचे स्वागत
पीएमपीएमएल कडून आज (दि. २१) पासून मार्ग क्रमांक २१३ हडपसर ते निरा हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मारुती तुपे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या हस्ते हडपसर गाडीतळ येथे या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, हडपसर डेपो मॅनेजर सुभाष
गायकवाड, असिस्टंट डेपो मॅनेजर मोहन दडस, जीवन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्ग क्रमांक २१३ –  हडपसर ते निरा या बससेवेचा मार्ग हडपसर, भेकराईनगर, देवाची उरुळी फाटा, वडकीनाला, झेंडेवाडी, दिवे, पवारवाडी, सासवड, यमाई शिवरी, तक्रारवाडी, बेलसर, जेजुरी, जेजुरी एमआयडीसी, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुरटी फाटा, राख गुळुंचे फाटा, थोपटे वस्ती, निरा असा असणार आहे.

याप्रसंगी बोलताना पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, “हडपसर ते निरा या बससेवेसाठी खासदार गिरीशजी बापट यांनी विशेष प्रयत्न केले. सध्या या बसमार्गावर तीन बसेसद्वारे साधारणपणे दर ६० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.”

सचिन लंबाते म्हणाले, “निरा ग्रामस्थांची पीएमपीएमएलच्या बससेवेची मागणी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक मारुती तुपे यांच्या प्रयत्नातून सुरू झाली. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी देखील निरा ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन चांगले सहकार्य केले.
सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता येणार आहे.”

हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “हडपसर ते निरा हे अंतर ६४ किलोमीटर असून या मार्गावर एकूण ११४ बसथांबे आहेत. हडपसर ते निरा पहिली बस सकाळी ५.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.०० वा. आहे. तसेच निरा ते हडपसर पहिली बस सकाळी ६.५० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ७.४० वा. आहे. या बससेवेचा सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी लाभ घ्यावा.”

सदरच्या उद्घाटन समारंभास निरा गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच हडपसर डेपोतील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: