fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट

‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेतर्फे आयोजित ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात’ ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वेत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथी ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा वि भागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे अध्यक्ष सुभाष देसाई याप्रसंगी बोलताना म्हणाले, “हा लघुपट यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. ‘प्रबोधनच्या ५०व्या वर्धापनाचे’ औचित्य साधून काय करता येईल? याविषयी सर्व पदाधिका-यांसोबत चर्चा करताना, ‘लघुपट महोत्सव’ करावा असे ठरले, आणि त्यासाठी एकमेव नाव होते ते म्हणजे ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ अशोक राणे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हा पहिला दर्जेदार महोत्सव प्रबोधनने यशस्वी केला. ज्यांनी ज्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे कौतुक. एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते. आणि ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते. या सर्व प्रतिभासंपन्न कलावंतांचे आभार, त्यांच्या उदंड सहभागामुळे हा लघुपट महोत्सव विशेष झाला, आम्ही यापुढेही प्रत्येकवर्षी हा महोत्सव असाच सुरु ठेवणार असून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत होतील.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading