जायका प्रकल्प मार्गी लावण्यापेक्षा अन्य गोष्टींवर महापालिका भर देते

पुणे : आले ते टेंडर रद्द केले. नव्याने टेंडर मागविण्याचा पत्ता नाही. असे असताना जायका प्रकल्पाच्या  कामावर देखरेख करण्यासाठी नव्याने सल्लागार एजन्सीची नेमून त्यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू आहेत. जायका प्रकल्प मार्गी लावण्यापेक्षा अन्य गोष्टींवर महापालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी महापालिका, जलशक्ती मंत्रालय आणि जायकाचे अधिकारी यांची गेल्या महिन्यात एकत्रित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. त्यामध्ये या प्रकल्पाचे कामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती करण्यास मान्यता देण्याची विनंती महापालिकेने केली असल्याचे समोर आले आहे. वास्तविक महापालिकेने जायका आणि जलशक्ती मंत्रालयाबरोबरच केलेल्या करारात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी “स्वतंत्र आणि पूर्णवेळ अंमलबावणी कक्ष स्थापन करू.असे आश्‍वासन दिले आहे.

त्यानुसार कक्षासाठी कागदोपत्री वीस अभियंत्यांची नियुक्ती केली असल्याचे महापालिकेने जलशक्ती मंत्रालय व जायकाला कळविले देखील आहे. असे असताना नव्याने पुन्हा प्रकल्पावर देखरेखीसाठी स्वतंत्र सल्लागार एजन्सी नेमण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

प्रकल्पासाठी स्वतंत्र्य सल्लागार एजन्सी नेमणे गरजेचे 

“महापालिकेकडून यापूर्वी या प्रकल्पाच्या कामासाठी टेंडर मागविले होते. परंतु त्या चढ्या दराने आल्या. जायका प्रकल्पाच्या कामावर देखरेख करण्यासाठी सल्लागार एजन्सी नेमण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती जलशक्ती मंत्रालय आणि जायकाला केली आहे. त्यांची गरज देखील आहे. त्यामुळे ही एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”

-विक्रम कुमार (आयुक्त महापालिका)

Leave a Reply

%d bloggers like this: