तीन नव्या मॉडेल्ससह ‘यझदी’ मोटरसायकलचे बाजारात पुनरागमन

मुंबई : जुन्या काळात लोकप्रिय ठरलेली ‘यझदी’ आता पुन्हा बाजारात आली आहे. जुन्या आणि नव्या पिढीलाही भुरळ घालण्यासाठी ‘यझदी’चे पुनरागमन झाले आहे. ‘यझदी’ची तीन नवीन दिमाखदार मॉडेल्स सादर करीत असल्याची घोषणा ‘क्लासिक लिजंड्स’तर्फे आज करण्यात आली.

‘यझदी’ची ‘अॅडव्हेंचर’, ‘स्क्रॅम्बलर’ आणि ‘रोडस्टर’ हे तीन मॉडेल्स बाजारात उपलब्ध झाले आहेत.   ‘जावा’ मोटरसायकल्सची किरकोळ विक्री करणाऱ्या ‘क्लासिक लिजंड्स’च्या वितरक नेटवर्कमध्ये भारतात ‘यझदी’ मोटरसायकलची नवीन श्रेणी आजपासून उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना ‘यझदी’ पाहता येईल, तिची ‘टेस्ट राईड’ घेता येईल, तसेच तिची नोंदणी करून डिलिव्हरी घेता येईल. आपल्या आवडत्या ‘यझदी’ मॉडेलचे ऑनलाइन बुकिंग करण्याचा पर्यायही ग्राहकांना www.yezdi.com वर 5 हजार रुपये भरून करता येईल.

आधुनिक तंत्रज्ञान आणि रेट्रो स्टाइलिंगच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या ‘यझदी’ मोटरसायकलींच्या या सर्व नव्या मॉडेल्समध्ये लिक्विड-कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड, 334 सीसी डिस्प्लेसमेंट असलेले ‘डीओएचसी’ सिंगल सिंलिंडर इंजिन बसविण्यात आलेले आहे. यातील ‘अॅडव्हेंचर’ रेंजची किंमत 2,09,900 रुपयांपासून सुरू होते, ‘स्क्रॅम्बलर’ रेंज 2,04,900 रुपयांपासून सुरू होते, तर ‘रोडस्टर’ रेंज 1,98,142 रुपयांपासून सुरू होते. या सर्व किंमती एक्स-शोरूम, दिल्ली अशा आहेत.

नवीन यझदी मोटरसायकलबाबत बोलताना ‘क्लासिक लिजंड्स’चे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “आमचा स्वतःचा एक वारसा आहे आणि आता आम्ही हा वारसा पुढेही चालवणार आहोत. मी स्वतः मोटारसायकलींचा रायडर असल्याने, हा माझ्यासाठी फार मोलाचा क्षण आहे. ‘यझदी’ या ब्रँडचे संरक्षक या नात्याने ‘यझदी’ आणि ‘यझदीचे रायडर’ यांचे सार तिच्या या नवीन अवतारांमध्ये आम्ही जतन करू शकलो आहोत. ”

‘क्लासिक लिजंड्स’चे सह-संस्थापक बोमन इराणी म्हणाले, “यझदी ब्रँडसोबत अनेकांच्या भावना, कथा जोडलेल्या आहेत. रायडर्सना मुक्तपणे बाहेर जाण्याचे, अधिक आठवणी निर्माण करण्याचे आणि अविस्मरणीय असा आनंद लुटण्याचे हे एक माध्यम आहे. हे कधीही न संपणारे एक साहस आहे, जे नुकतेच पुढील स्तरावर गेले आहे!”

 ‘क्लासिक लिजंड्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जोशी म्हणाले, “यझदी मोटरसायकल नव्याने विकसित करताना तिचा मूळ आत्मा अबाधित ठेवणे, हे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. आपल्यासमोर आज सादर होणाऱ्या तिन्ही मोटारसायकली विशेष उद्दिष्टांनी निर्मित आहेत. विविध वयोगटांतील व स्तरांतील रायडर्सच्या गरजांसाठी त्या खास बनविण्यात आल्या आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: