आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी करणार योगाशास्त्रावर संशोधन

पुणे : भारताच्या समृद्ध परंपरेचा एक महत्त्वपूर्ण आधार असणारी अभिजात योगसाधना समजून घेणे, तिचा सखोल अभ्यास करणे आणि त्यात संशोधन करणे याची अनोखी संधी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. विद्यापीठाने या संदर्भात एक आश्वासक पाऊल उचलले असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशन (एम्.व्ही.आर्.एफ्.) समवेत सामंजस्य करार केला आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर आणि महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक तथा संचालक आत्मयोग-गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी आज महर्षि न्यायरत्न विनोद यांच्या १२० व्या तसेच स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभ दिनी या करारावर पुणे विद्यापीठात स्वाक्षऱ्या केल्या.

अभिजात योगसाधनेसंबंधी मूलभूत संशोधन करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कराराद्वारे नव्या संधीचे दरवाजे उघडले आहेत.

या प्रसंगी बोलताना कुलगुरु डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘योग म्हणजे फक्त आसने किंवा सूर्यनमस्कार नव्हे, तर तो स्व-शोधाचा एक प्रवास आहे. योगाभ्यासातून ती दिशा विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला असून त्याचा त्यांना निश्चितपणे चांगला फायदा होईल.’’

डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, ‘‘मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये ज्या संकल्पना शिकवल्या जातात त्यांच्या मुळाशी जाण्यासाठी योगाभ्यास निश्चितच उपयुक्त ठरतो. मनाचा तळ गाठण्यासाठी, खऱ्या मन:शांतीसाठी विद्यार्थ्यांना योगसाधना आणि योगाभ्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. संशोधनाची व अभ्यासाची ही गरज लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि  महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशनने संयुक्तपणे जो पुढाकार घेतला आहे तो सर्वांनाच निश्चितपणे खूप उपयुक्त ठरणार आहे.’’

या नव्या करारांतर्गत  योगाभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना या संशोधनातून एक नवी दृष्टी मिळणार असून विविध मानसशास्त्रीय संकल्पना स्पष्ट होण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही हा अभ्यास उपयुक्त ठरू शकेल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: