डॉ.कल्याण गंगवाल यांना ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ चा जीवनगौरव पुरस्कार
सोशल रिस्पॉन्सिबीलिटी तर्फे जीवनगौरव, विवेकानंद रत्न, जिजाऊ रत्न पुरस्कारांची घोषणा
पुणे : सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आणि राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने जीवनगौरव, विवेकानंद युवा रत्न, जिजाऊ युवा रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कल्याण गंगवाल यांना दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्याकरीता माजी धमार्दाय सहआयुक्त दिलीप देशमुख, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक व सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, थिंक पॉझिटिव्हचे संपादक यमाजी मालकर, मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे हेमंत ठाकूर, महाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश घोष, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शाखेतील अभ्यासू तज्ञ, डॉक्टर व वैद्य यांच्या उपस्थितीत ‘कोरोना मुक्त भारत’ हे विशेष अभ्यास चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ.विजय भटकर हे आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.
जीवनगौरव पुरस्कारासोबतच जिजाऊ युवा रत्न पुरस्कार नीता मगर, अमृता जगताप यांना आणि विवेकानंद युवा रत्न पुरस्कार चेतन मराठे, सागर पाटील, अरविंद हमदापुरकर, केदार गजॠषी, स्वप्नील गंगवणे, संदेश बनसोडे, शिवाजी तायडे, शिवशंकर स्वामी यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त भारत या चर्चासत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांसह डॉ. मनीषा सोळंकी, आयुर्वेदाचार्य डॉ. अनुप गांधी, आयुर्वेद पंचगव्य चिकित्सक वैद्य अजित उदावंत, वैद्य ज्योती मंदोगिरी आदी सहभागी होणार आहेत.
विजय वरुडकर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात योगदान देणा-या व समाजाप्रती सेवाभावी ठेवणा-या कार्यकर्त्यांना दरवर्षी संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येते. यंदादेखील समाजातील निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव संस्थेतर्फे करण्यात येत आहे. रमेश अग्रवाल, उमेश दुगाणी, अॅड. कान्होपात्रा गायकवाड, डॉ. आशिष पोलकडे, जगदीश गजऋषी, रवींद्र वाघोले, बाबू शिवांगी, विठ्ठल मुरकेवार, विशाल वरुडकर, सुनील बेनके, ज्योत्स्ना पुरंदरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
