समाजकल्याण वसतिगृहे सुरू ठेवा नाहीतर स्वाधार योजनेचा लाभ द्या – छात्रभारती
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली असून online शिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. तसेच सर्व शासकीय वसतिगृह देखील बंद करण्यात येणार आहेत. यामुळे केवळ महिनाभारांपूर्वी शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडची वाट धरावी लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवावीत नाही तर स्वाधार योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी छात्रभारतीच्या वतीने समाजकल्याण आयुक्तांकडे केली आहे.
यावेळी छात्रभारती संघटनेने समाजकल्याण आयुक्तालय येथे समाजकल्याण आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी छात्रभारती पुणे जिल्हाध्यक्षा छाया काविरे, संपदा डेंगळे ,आनंद केंद्रे व छात्रभारती संघटनेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
छाया काविरे म्हणाल्या, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली असून online शिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. तरी, या कारणास्तव सर्व शासकीय वसतिगृह बंद करण्यात येणार आहेत.त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.आम्हाला स्वाधार योजनेचा लाभ द्या अशी मागणी आम्ही समाजकल्याण आयुक्त यांच्या कडे केली आहे, असे छाया काविरे म्हणाल्या.
दरम्यान, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन निर्बंधांनुसार हॉस्टेल बंद करत असल्यामुळे सर्वांना घरी जावे लागणार आहे. अचानक संचारबंदी केल्यामुळे तसेच बस बंद असल्यामुळे खाजगी travels कंपन्या अमाप पैसे उकळत आहेत. आत्ताच एका महिन्यापूर्वी सर्वजण गावावरून कॉलेजसाठी आले होते. सारखे जाण्या-येण्यासाठी पैसे खर्च करणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. अजून विद्यार्थ्यांना कोणतीही scholarship किंवा मासिक भत्ता मिळालेला नाही. शिवाय घरी गेल्यानंतरही गावाकडे नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही, अशा अनेक समस्यांना सध्या विद्यार्थी तोंड देत आहेत.
.
