Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘प्रभातस्वर’द्वारे रसिकांना नववर्षाची सांगीतिक भेट : पंडित शौनक अभिषेकी यांचे भावपूर्ण गायन

पुणे : ‘ना मै तिहारो पतीत उद्धारन’, ‘नंद भयो है आज सखिया’, ‘धन धन री..’, ‘का ऐसी छेड करत गिरधारी’ अशा वैविध्यपूर्ण रचनांमधील भावोत्कटता-संवेदनशीलता जपत पंडित शौनक अभिषेकी यांनी गायनातून बंदिशीतील आशय रसिकांपर्यंत पोहोचविला. आग्रा, जयपूर तसेच अत्रौली घराण्याच्या गायकीचा सुंदर मिलाफ साधत केलेले सादरीकरण रसिकांसाठी पर्वणी तर ठरलेच पण नववर्षाच्या सुरुवातीस प्रभातकालीन रागातून मिळालेली प्रासादिक स्वरभेट गानरसिकांना तृप्त करून गेली.

निमित्त होते ते गायिका अपर्णा केळकर आयोजित आणि स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत ‘प्रभातस्वर’ या प्रभातकालीन रागांच्या मैफलीचे. नववर्षातील पहिले पुष्प विख्यात गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र व शिष्य पं. शौनक अभिषेकी यांनी डेक्कन जिमखान्यावरील गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारातील ज्ञानवृक्षाखाली आज (दि. 2 जानेवारी 2022) प्रसन्न वातावरणात गुंफले. पं. शौनक अभिषेकी यांनी स्वत:च्या गायकीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात युवा पिढीतील आश्वासक गायक म्हणून स्वत:चा ठसा उमटविलेला आहे याची प्रचिती आज पुन्हा अनुभवायला मिळाली. पं. अभिषेकी यांना पंडित मंगेश मुळे (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), शुभम कुलकर्णी, अभेद अभिषेकी, सत्यजित बेडेकर, विश्वजित मेस्त्री (तानपुरा, सहगायन) साथ केली.

पंडित शौनक अभिषेकी यांनी मैफलीची सुरुवात ‘मनरंजनी’ या रागाने केली. झुमरा तसेच झपतालामध्ये रचना सादर केल्या. ‘ना मै तिहारो पतीत उद्धारन’ ही रचना सादर करताना ‘सम ही पाण्यासारखी आली पाहिजे, पाणी कुठून झिरतपे ते कळत नाही’ या पंडित अभिषेकीबुवांच्या शब्दांची आठवण त्यांनी करून दिली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून शिकलेली अत्रौली घराण्यातील आनंद भैरव रागातील ‘नाही मो मे गुण ऐसो’ ही रचना सादर करताना त्यातील विस्ताराच्या विविध छटा त्यांनी उलगडून दाखविल्या.

उस्ताद अल्लार खाँ यांनी सांगितलेली ‘निपट नट कठोरी रे’ तसेच ‘धन धन री..’ ही क्वचितच ऐकावयास मिळणारी खट तोडीतील रचना रसिकांच्या मनावर ठसा उमटवून गेली. ‘का ऐसी छेड करत गिरधारी’, ‘सैय्याँ नही आए..’, ‘निंदीयासे नैना झुके बलमवा’ या विविध रचनांची झलकही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. कलाकारांचे सत्कार मकरंद केळकर आणि गणेश जाधव तसेच दीपा हेर्लेकर, सुनील हरके यांनी केले. आभार अपर्णा केळकर यांनी मानले.

गुरूंचे अस्तित्व जाणवायला लागल्यानंतर गाणे साकारते : पंडित शौनक अभिषेकी
एका कलाकाराला ऐकायला सहसा दुसरे कलाकार येत नाहीत, अशी परिस्थिती असताना ‘प्रभातस्वर’ मैफलीनिमित्त आज अनेक ज्येष्ठ, युवा कलाकारांची लक्षणीय उपस्थिती मला सुखावून गेली आहे, पूर्वीच्या काळी अनेक दिग्गज कलाकार मैफलीनिमित्त एकत्र येत आणि आवर्जून दुसर्‍या कलाकारांना ऐकत असत, या निमित्ताने सांगीतिक मूल्यांची देवाणघेवाण होत असे. आजच्या काळातही असे घडावे आणि कोंडलेपण दूर व्हावे, अशी इच्छाही त्यांनी रसिकांशी संवाद साधताना व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading