दिग्दर्शकाने तुमच्यात बघितलेली भूमिका तशीच साकारता येणे हेच खरे यश – दिलीप प्रभावळकर
पुणे : माझा एरवीचा चेहरा फारच सरळसाधा आहे. मात्र, दिग्दर्शकांना माझ्या चेह-यात वेगवेगळ्या भूमिका दिसल्या आणि त्या भूमिका मला मिळाल्या.मी साकारलेली चेटकीण, नंदू, आबा, तात्या विंचू अशा ज्या वैविध्यपूर्ण भूमिका मला मिळाल्या त्यामध्ये मला त्या दिग्दर्शकांची चोखंदळ नजर फार महत्त्वाची वाटते. दिग्दर्शक तुमच्यात जी भूमिका बघतो, ती साकारता येणे हे अभिनेत्याचे खरे यश असते, असे मत ज्येष्ठ अभिनते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात आयोजित ‘अभिनेत्याशी गप्पा’ या कार्यक्रमात श्रीकांत चौगुले यांनी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रभावळकर म्हणाले, मी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन एका फार्मासिस्ट कंपनीत चांगल्या हुद्दावर नोकरी करीत होतो. त्यामुळे नोकरी सांभाळून मी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होतो. काही भूमिकांसाठी तयारी करावी लागते, पण काही भूमिका अगदी सहजपणे तुमच्यात मुरून जातात. ‘चौकट राजा’ या चित्रपटात खरेतर मी वेगळी भूमिका करणार होतो आणि त्यातील नंदूची भूमिका परेश रावल करणार होते. हे सगळे ठरल्यानंतरअचानक नंदूची भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेसाठी मी पुण्यातील कामयानी संस्थेला भेट दिली, एका मानसशास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन घेतले, बोलण्यातील आणि हालचालीतील लकबी यांच्या निरीक्षणातून मी ही भूमिका निभावली. कधी कधी खूप दडपणाखाली तुमची सर्जनशीलता चांगले काम करते.
चित्रपती व्ही. शांताराम यांनी मला त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. पण मी माझ्या नोकरीच्या कारणामुळे चक्क त्यांची ही ऑफर नाकारली. ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातील महात्मा गांधींची भूमिका साकारण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ मेकअप करावा लागायचा.
प्रत्येक प्रॉडक्टला एक शेल्फ लाईफ असते. त्यामुळे नाटक किंवा मालिकांसरख्या कलाकृतींना देखील एक शेल्फ लाईफ असले पाहिजे, असे माझे मत आहे. त्यामुळे कलाकृती ताजी असतांना, ती लोकांना आवडत असतांना किंवा यशाच्या शिखऱावर असतांना थांबवणे मला अधिक संयुक्तिक वाटते. त्यामुळेच ‘हसवा फसवी’ हे नाटक ऐन भरात असतांना साडेसातशे प्रयोग केल्यानंतर मी त्याचे प्रयोग थांबवले. कारण यशाच्या शिखरावर असतांना थांबणे मला नेहमीच योग्य वाटते.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांनी आभार मानले.
