समाविष्ट गावांमधील बोगस नोकर भरती प्रकरण: ‘त्या’ १८ गावांतील २१२ सरपंच, उपसरपंच, सदस्यांवरही कारवाई होणार
पुणे : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी १८ गावांमध्ये बोगस कर्मचारी भरती करण्यात आली असल्याचे आता सिद्ध झाले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून आतापर्यंत या प्रकरणात ग्रामसेवकांवर कारवाईही झाली आहे. आता यामध्ये या १८ गावांमधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असे २१२ लोकप्रतिनिधीचाही सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, ही १८ गाव सध्या महापालिकेत समाविष्ट असल्याने या लोकप्रतिनिधींवर कोणत्या कायद्यानुसार कारवाई करावी, हे समजत नसल्याने याबाबत मार्गदर्शन व पुढील कारवाईसंदर्भातील लेखी पत्र जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये नोकरभरती करण्यासाठी सदस्य मंडळाने ठराव केले होता. या ठरावावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या सह्या आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सरपंच उपसरपंच,सदस्य यांचाही सामूहिक समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे. सदस्यांनी या ठरावाला विरोध केल्याची नोंद दप्तरामध्ये कोठेही नाही.
याबाबत विचारले असता, यासंदर्भात कोणत्याही कायद्याची आम्हाला माहिती नाही आम्ही सह्या केल्या, तेव्हा हे प्रोसिडिंग लिहिले गेले नव्हते. असे कारण अनेक सदस्य देत आहेत.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, आम्ही चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या सर्व २१२ ग्रामपंचायत सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. यामध्ये सह्या करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी ठराव मांडले त्यांची जबाबदारी जास्त आहे.
