महापौर न केलेल्या कामाचा ढींडोरा पिटतात – सोनाली मारणे
पुणे: आता केवळ भाषणबाजी आणि जाहिरातीतून न केलेल्या कामाचा ढींडोरा पिटणे एवढेच महापौर आणि सत्ताधारी भाजपाच्या हातात आहे. आगामी मनपा निवडणुकीत पुणेकर या खोट्या प्रचाराला बळी न पडता जाब विचारतील, या भीतीतून असा न केलेल्या कामाचा अपप्रचार महापौरांकडून सुरू असून हे दुर्दैवी आहे, अशी टीका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी केली आहे.
सोनाली मारणे यांनी काढलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ नुकतेच वाराणसी येथील महापौर परिषदेला संबोधित करून आले. त्यांची मुलाखतही आज एका वृत्तपत्रात वाचायला मिळाली. त्या अनुषंगाने महापौरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर खालील प्रश्न पुणेकरांच्या वतीने विचारले जात आहेत.
१) या परिषदेमध्ये बोलताना ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत पुणे शहरातील महानगरपालिकेने स्वच्छतेचे काम उत्कृष्ट केले म्हणून देशात पाचवा क्रमांक मिळाला असल्याचे महापौरांनी अभिमानाने सांगितले, मात्र वस्तुस्थिती पाहता पुण्यामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग, त्याची दुर्गंधी, कचरा वेचकांचे प्रश्न, कचऱ्यावर प्रकिया करणाऱ्या प्रकल्पांची अवस्था, कचरा डेपोच्या परिसराच्या अडचणी यासंदर्भात महापौर चकार शब्द काढत नाहीत. कचऱ्याच्या अनुषंगाने पुणेकरांच्या तक्रारींवर महानगरपालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसते. पुण्याच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नावर मनपाचे अपयश अशा परिषदांमधून भाषणे देऊन झाकले जाणार आहे का ?
२) शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार ’मनपाच्या साहाय्याने मोठे काम करत असल्याचे मुलाखतीत महापौरांनी सांगितले. मात्र मागील सात वर्षात केंद्र सरकारने महानगर पालिकेमार्फत कोणत्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत ?
३) नदी सुधार, नदी स्वच्छता या संदर्भात केंद्र सरकार व मनपा करत असलेल कामाची यादी महापौरांनी मुलाखतीत सांगितली, मुळा-मुठा या पुण्याच्या जीवनवाहिनी नद्यांच्या स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकार व मनपाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘जायका’ प्रकल्प अजून सुरू झालेला नाही. का?
४) पुण्यामध्ये मोठा गाजावाजा करत स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येऊन आता पाच वर्षाहून अधिक काळ होत आला. या काळात जाहिराती व्यतिरिक्त कोणतेही महत्त्वाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झाले नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोणते काम मनपा करत आहे ज्याचा फायदा नागरिकांना होईल हे सांगाल का ?
५) पुण्यामध्ये मनपाच्या यंत्रणेचा गैरवापर करत काही विकसक पोलिस बंदोबस्तात गोरगरीब जनतेच्या घरांवर बुलडोझर फिरवतात हे पुण्यातील जनतेने अनुभवले आहे. पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी धारकांसाठी मागील पाच वर्षात काय केले ?
६) ‘बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी’ असं आपल पुण्याचं वर्णन महापौरांनी केलं, मागील पाच वर्षात भाजपाची सत्ता असताना मनपाने पुण्याची वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक सुविधा, समान पाणीपुरवठा योजना, प्रशासनातील भ्रष्टाचार, मनपाची आरोग्य व्यवस्था, खड्डे असलेले रस्ते या प्रश्नांवर नेमके काय काम केले ? त्याचे उत्तर मिळेल का ?
