वातावरणीय बदलाची झळ कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्वाचा – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
विधानमंडळ सचिवालय, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आणि राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत वातावरणीय बदल या विषयावर आज विधानभवन येथे विधिमंडळ सदस्यांसाठी सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ग्रामीण भागात वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम जाणवत आहे. याकरिता ग्रामीण भागातील तरूण लोकप्रतिनिधींनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यातील विविध विभागांना ज्याप्रमाणे अर्थसंकल्पात निधी राखून ठेवला जातो. त्याप्रमाणे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी नियोजनामध्ये निधी राखून ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वातावरण बदलाशी संबंधित अहवालावरून गंभीर दुष्परिणामांना सामारे जावे लागेल असे सूचविले आहे. याकरिता सर्वांनी उपाययोजना करण्याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शाश्वत विकासाची देशात 17 उद्दिष्टे देण्यात आली आहेत. त्यात पर्यावरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. वातावरणीय बदलाच्या गंभीर दुष्परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात जे विविध उपक्रम राबविले आहेत त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम आपल्या घरापर्यंत आले आहेत. लोकप्रतिनिधींनी पर्यावरण संवर्धनाच्या वैश्विक कामाकरीता एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण गावापासून सुरूवात केल्यास जागतिक स्तरावर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. वातावरण बदलाचे दुष्परिणाम काय होत आहेत, कसे होत आहेत हे सर्वांना माहिती आहे, परंतू ते का होत आहेत हे आता लक्षात आल्याने याविषयी गांभीर्याने काम करून आजच कृती करणे तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करणे गरजेचे आहे.
