Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात रसिकांना घडणार साहित्य आणि कला विश्वाची रंजक सफर 

 संमेलनाध्यक्षाः डॉ. कसबे आणि प्रभावळकरांचा होणार गौरव

पुणेः-   साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा दिनांक 25 आणि 26 डिसेंबर रोजी साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, कथाकथ, काव्यवाचन आणि मान्यवरांच्या मुलाखतीच्या माध्यमातून  रसिकांना साहित्य आणि कला विश्वाची रंजक सफर घडणार आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी दिली.

यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

दिलीप बराटे म्हणाले की,  यंदा या संमेलनाचे 21 वे वर्षे असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कारासाठी अनुक्रमे डॉ. रावसाहेब कसबे आणि दिलीप प्रभावळकर यांची निवड करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे आयोजित या दोन दिवसीय संमेलनात शनिवार दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी, सकाळी 9.30 वाजता, प्रसिद्ध चित्रकार प्रा. राहुल बळवंत यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10.00 वाजता शब्दांगण, पुणेचा सहभाग असलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. तर  साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी दुपारी 2.00 वाजता होणा-या कथाकथन कार्यक्रमात डॉ. प्रतिमा इंगोले आणि विजयराव जाधव सहभागी होणार असून प्रा.  आप्पासाहेब खोत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
दुपारी 4.00 वाजता ‘जागतिक युद्धखोरी आणि भारताची दिशा’ या विषयावर श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या परिसंवादात जतीन देसाई, संजय सोनवणी आणि डॉ. अमोल देवळेकर सहभागी होणार आहेत. तर संध्याकाळी सहा वाजता अस्मिता ठाकूर निर्मित आणि कला अनुभूती सेंटर आयोजित ‘कथ्थकधारा’ हा वैविध्यपुर्ण कथक नृत्य रचनांचा अविष्कार सादर होणार आहे.
याच दिवशी रात्री 8.00 वाजता, कवी संमेलन आहे.
26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता  कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोल्डन मेमरीज प्रस्तुत ‘आठवणीतल्या शांताबाई’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. . दुपारी 2.00  वाजता ‘साहित्य आणि राजकारणातील जातीयता’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान अविनाश धर्माधिकारी भूषविणार असून यामध्ये संजय आवटे, दिलीप बराटे आणि डॉ. गणेश मोहिते सहभागी होणार आहेत. दुपारी 4.00  वाजता ‘अभिनेत्याची गप्पा’ या कार्यक्रमात  अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत श्रीकांत चौगुले घेणार आहेत.
तर  संध्याकाळी 6.00  वाजता  डॉ. न.म.जोशी यांच्या हस्ते ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कारा’चे वितरण होणार आहे. या संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या कविसंमेलनाने रात्री 8.00 (आठ) वाजता होणार आहे.

Leave a Reply