मध्य रेल्वेवरील ३७९ स्थानकांवर मोफत वाय-फाय इंटरनेट सुविधा.
मुंबई : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटल उपक्रम राबवण्यात आणि राष्ट्रीय ट्रेन चौकशी प्रणाली (NTES) तसेच प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाभिमुख प्रवासी अनुप्रयोग/सुविधांच्या अंमलबजावणीत भारतीय रेल्वे आघाडीवर आहे. त्याचाच एक भाग म्हणून, रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी/ सुविधेद्वारे प्रवाशांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे पुढे जात आहे.
एक प्रमुख लोकस्नेही उपाय म्हणून, मध्य रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या ४,१५२ किलोमीटर मार्गावरील ३७९ स्थानके ऑप्टिकल फायबर केबल (OFC) ने आच्छादित मोफत हायस्पीड वाय-फाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहेत. मध्य रेल्वेवरील या स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पूर्ण झाले आहे.
मध्य रेल्वेवर विभागनिहाय कव्हरेज पुढीलप्रमाणे आहे:
मुंबई विभाग: ८८ स्थानके,
भुसावळ विभाग : ८३ स्थानके, नागपूर विभाग: ७४ स्थानके,
पुणे विभाग: ५६ स्थानके आणि सोलापूर विभाग : ७८ स्थानके
या उल्लेखनीय डिजिटल इंडिया उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासकीय सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेल्वे मिनी रत्न “RAILTEL” कडे सोपविण्यात आली आहे आणि त्यांनी आतापर्यंत भारतातील ६०७०+ स्थानकांवर ही सुविधा सुरू केली आहे.
हे जगातील सर्वात मोठे आणि जलद सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचा सर्वच रेल्वे स्थानकांवर (हॉल्ट स्थानके सोडून) वाय-फाय प्रदान करण्याचा मानस आहे. हे साध्य होण्यासाठी काही ‘शे’ स्थानके उरली आहेत जेथे कामही सुरू आहे.
रेल्वे स्थानके ही अशी ठिकाणे आहेत जिथे समाजाचा एक भाग एकत्र येतो. आधुनिकीकरणाचा वेग आणि स्मार्टफोन वापरात अनेक पटींनी वाढ झाल्याने ‘डिजिटल इंडिया’ क्रांती घडली आहे. २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात, स्थानकांवर मोफत वाय-फाय इंटरनेट सुविधा प्रदान करण्याच्या प्रकल्पाचा उद्देश हा भारतभरातील रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय प्रवेश आणणे हा आहे. यामध्ये दुर्गम खेड्यांमध्ये असलेल्या छोट्या स्थानकांचाही समावेश आहे.
स्थानकांत येणारी जनता हाय डेफिनिशन (एचडी) व्हिडिओ स्ट्रीमिंग, चित्रपट, गाणी, गेम डाउनलोड करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यालयाचे काम ऑनलाइन करण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकतात. स्पर्धात्मक परीक्षांना बसलेले विद्यार्थी, विशेषत: संघ लोक सेवा आयोग (UPSC), आरआरबी (RRB), आरआरसी (RRC), पदवी, बारावी (HSC) आणि दहावी (SSC) चे उमेदवार इंटरनेटचा मर्यादित प्रवेश असलेल्या दुर्गम ठिकाणांहून, त्यांच्या तयारीसाठी स्टेशन वाय-फाय सुविधा वापरतात. प्रवासी देखील त्यांच्या वैयक्तिक उपकरणांवर मनोरंजनासाठी या सुविधेचा वापर करत आहेत.
दादर, मनमाड, भुसावळ, नागपूर, बल्हारशाह, पुणे, मिरज, सोलापूर, अहमदनगर आणि कलबुर्गी या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवरील प्रवाशांकडून मिळालेला अभिप्राय उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, अखंड डेटा प्रवेश आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा असल्याचे दर्शवतो.
रेलवायर वाय-फाय सुविधा वापरण्यास अतिशय अनुकूल आहे. कनेक्शन चालू करण्यासाठी, प्रवाशांनी वाय-फाय पर्याय स्कॅन करणे आणि रेलवायर निवडणे आवश्यक आहे. एकदा ब्राउझर वापरकर्त्याला रेलवायर पोर्टलवर घेऊन गेला की, तो एक मोबाइल नंबर विचारेल ज्यावर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. एकदा कनेक्ट झाल्यानंतर, वाय-फाय कनेक्शन ३० मिनिटे टिकेल. यामुळे रेल्वे प्रवाशांना जोडलेले राहण्यास आणि रेल्वेच्या माहितीसह अपडेट राहण्यास मदत होते.
