Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे

पुणे : कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येत्या 26 डिसेंबरला पुण्यात चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे व लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांची तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व विचारवंत, यशदाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद्घाटन पर्यावरणप्रेमी स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील करणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांनी दिली.

यंदाचे संमेलन पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सदन, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले असून सकाळी 8:30 वाजता वृक्षदिंडीने संमेलनाच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी 9:30 वाजता पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12:15 वाजता दि कॉसमॉस बँकचे डेप्युटी चिफ जनरल मॅनेजर आनंद चाळके यांचे बीजभाषण होणार आहे. दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथील पहिल्या ‘विश्वात्मक संत साहित्य संमेलनाची भूमिका’ या विषयावर प्रा. डॉ. दत्तात्रय डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार असून वनसंरक्षक हभप रंगनाथ नाईकडे, राज्य न्यायाधीश संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप घुमरे, धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती बी. डी. कुलकर्णी सहभागी होणार आहेत. दुपारी 2:40 वाजता कर्नाळा ट्रस्टच्या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकभेट दिली जाणार आहेत. यात देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांचा सहभाग असून अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत श्याम भुर्के आहेत. दुपारी 3:20 वाजता ‘जागतिक पर्यावरण आरोग्य आणि आपली जबाबदारी’ या विषयावर सुभाष बडवे विचार व्यक्त करणार असून अध्यक्षस्थानी शिवाजीराव कवडे आहेत.

दुपारी 4 वाजता पर्यावरण आरोग्य आणि राष्ट्रभक्ती या विषयावर काम करणार्‍या संघटनांसाठी धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती सु. मु. बुक्के यांचे व्याख्यान होणार असून ज्येष्ठ समाजसेविका मायाताई प्रभुणे अध्यक्षपदी असणार आहेत. सायंकाळी 4.45 वाजता साहित्य संमेलनाचे समालोचन, समारोप सत्राचे अध्यक्ष विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले करणार आहेत. या वेळी पर्यावरणप्रेमी स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील व माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याच वेळी मान्यवरांना समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळा, देणगीदारांसह संमेलनात सहभागी संस्थांचा सत्कार असा भरगच्च कार्यक्रम असून सायंकाळी 6:30 वाजता कविसंमेलन आणि देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading