तू नगरसेवक होणार…… राज ठाकरेंनी दिले येरवड्यातील “त्या” कार्यकर्त्याला वचन
पुणे : एरवी मोठी राजकीय नेतेमंडळी पक्षातील प्रमुख प्रतिष्ठित किंवा महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतात, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना येरवड्यातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या थेट घरी भेट दिली. पक्षाचा कार्यकर्ता स्थानिक पातळीवर कसा काम करतो, यासह त्याची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिली होती.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना येरवड्यातील गांधिनगर येथील मनसेचे उप विभागअध्यक्ष मनोज ठोकळ यांच्या वस्तीतील एका छोट्या घरात येऊन त्यांनी चहापाणी केला. सुमारे अर्धा तास ते त्यांच्या घरी आवर्जून थांबले होते. एवढी त्यांच्या आई, पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्य यांची आपुलकीने विचारपूस केली. येरवडा सारख्या परिसरात मनसेचा कार्यकर्ता स्थापनेपासून प्रामाणिकपणे काम करतो. शहरातील सत्ताधारी मोठ्या पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकाला नागरी प्रश्नासंदर्भात जाब विचारतो. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जातो. सर्वसामान्य कुटुंबातील अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा मला अभिमान असून “मी तुझ्या पाठीशी आहे, तू नगरसेवक होणार” अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनोज ठोकळ यांना शुभेच्छा दिल्या.
मनोज ठोकळ यांचे वडील सुरेश ठोकळ हे या भागातील जुने सामाजिक कार्यकर्ते होते. मात्र त्यांच्या कार्याची दखल कोणत्याही राजकीय पक्षाने घेतली नाही. गांधीनगरच्या स्थापनेपासून ते सक्रिय कार्यकर्ते होते. पुणे महापालिकेच्या दोन निवडणुका त्यांनी लढविल्या होत्या अगदी थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. दुर्देवाने 1994 साली त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची धुरा मनोज यांनी हातात घेतली. मागील पंधरा वर्षांपासून मनसेच्या माध्यमातून ते या भागात कार्य करत आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी पक्षाचा राजकीय सभा तसेच सांस्कृतिक महोत्सवांना येरवड्यात हजेरी लावली होती. मनसेचा कार्यकर्ता पक्षाचे काम करताना त्याची कौटुंबिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा आगळावेगळा उपक्रम राबवला. राज ठाकरे यांनी थेट येरवड्यातील घेऊन पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवून लढण्याचे बळ दिल्यामुळे सत्ताधारी तसेच इतर राजकीय पक्षातील ज्येष्ठ मंडळींनी या “राजभेटी”चा चांगलाच धसका घेतला आहे.
