शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करत असलेला अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. म्हाडा पेपरफुटी संदर्भात पुणे सायबर पोलीस तपास करीत असताना TET परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील अटक आरोपी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष देशमुख व त्याचे साथीदार संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांची चौकशी सुरू असतानाच त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करत असलेला अभिषेक सावरीकर याच्या मदतीने 2019, 20 मधील शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारून परीक्षेच्या निकालात फेरफार केला असल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांनी मिळाली होती.

त्यानुसार, पुणे सायबर पोलीसांनी त्यांची बोलावून कसून चौकशी केली असता त्यांनी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी असणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितेश देशमुख, संतोष व अंकुश हरकळ हाताशी धरून त्यांच्याकडून प्रत्येकी पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत रक्कम स्वीकारून सुमारे चार कोटी वीस लाख रुपये जमा करून ते आपसात वाटून घेतल्याची माहिती देखील पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
