सुयश – मितालीचा ‘हॅशटॅग प्रेम’ देणार प्रेमाची नवी अनुभूती
आजही प्रेम हा विषय निर्माता-दिग्दर्शकांइतकाच रसिकांनाही आपलासा आणि फ्रेश वाटत आहे. त्यामुळंच नवनवीन प्रेमकथा रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यातून प्रेमाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘हॅशटॅग प्रेम’ हा मराठी चित्रपटही प्रेक्षकांना प्रेमाची नवी अनुभूती देणारा ठरणार आहे.
निर्माते अनिल गोविंद पाटील यांच्या माऊली फिल्म प्रोडक्शन आणि जिसीम्स निर्मित अर्जुन सिंग बरन, कार्तिक दि. निशाणदार प्रस्तुत तसेच पिकल एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने तयार केलेला ‘हॅशटॅग प्रेम’ रसिक दरबारी सादर होत आहे. राजेश बाळकृष्ण जाधव यांनी ‘हॅशटॅग प्रेम’चं दिग्दर्शन केलं आहे. अरविंद गोविंद पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘हॅशटॅग प्रेम’ प्रेम हे आजच्या तरुणाईसह अबालवृद्धांचं लक्ष वेधून घेणारं टायटल आणि नवी कोरी नायक-नायिकांची जोडी हे या चित्रपटाचं प्रथमदर्शनी आकर्षणाचं केंद्र बनलं.
मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मितालीनं मराठीपासून हिंदीपर्यंत आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला असून, छोटा पडद्यासह मोठ्या पडद्यानं सुयशलाही आपलं वेगळं फॅन फॅलोईंग दिलं आहे. अशा दोन कलाकारांची केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. संदिप पाठक, मिलिंद दास्ताने यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पटकथालेखक निखिल कटारे यांनी ‘हॅशटॅग प्रेम’ची कथा-पटकथा लिहिली आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांची अफलातून कॅमेरावर्क केलं आहे. संजाली रोडे आणि कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीत दिलं आहे. गायक-संगीतकार रोहित राऊतनं पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. केशव ठाकूर यांनी कला दिग्दर्शन केलं असून, महेश भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
