Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांंचे सोमवारी (दि. ६) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.७) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील त्यांच्या निवासस्थानापासून ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत लक्ष्मी रस्ता मार्गे फुलांनी सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पं.वसंतराव गाडगीळ, रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, नगरसेवक धीरज घाटे, गणेश बीडकर, आबा बागुल, गोपाळ तिवारी, सतिश देसाई, अंकुश काकडे, संजय मोरे, अजय खेडेकर, राजेश येनपुरे, अ‍ॅड.गायत्री खडके, पृथ्वीराज सुतार, अनिल साळवे, प्रविण चोरबेले, कॉसमॉस बँकेचे मिलिंद काळे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, बाळासाहेब दाभेकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त ह.भ.प.शिवाजीमहाराज मोरे, यांसह मानाच्या, प्रमुख व पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, दगडूशेठ गणपतीच्या सेवेत अशोक गोडसे यांनी आपले आयुष्य वेचले. गणेशोत्सवाची पुण्यमयी परंपरा अशोकरावांनी वाढविली. गाडगीळ यांनी चारही पीठांच्यावतीने गोडसे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अण्णा थोरात म्हणाले, अशोकरावांनी आयुष्यभर सर्व मंडळांना मार्गदर्शन करुन त्यांना चांगले कार्य करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांचे कार्य सातत्याने सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंकुश काकडे म्हणाले, गणपती मंडळाच्या माध्यमातून अशोक गोडसे यांनी पुणेकरांची सेवा केली. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.

गोपाळ तिवारी म्हणाले, गणेशोत्सवाने देशाला दिशा दिली आहे. अशोक गोडसे हे सच्चे गणेशभक्त होते. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे असे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते.

गणेश बीडकर म्हणाले, तात्यासाहेब गोडसे यांच्यानंतर अशोकराव गोडसेंनी आम्हा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गणपती मंडळाशी संबंधित निर्णय असो किंवा प्रशासनाशी चर्चा असो, यामध्ये त्यांचा पुढाकार असे.

संजय मोरे म्हणाले, ससून रुग्णालयातील गरजू रुग्णांना मदत करणे. धरणातून गाळ काढून जास्तीत जास्त पाणीसाठी पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यास सहाय्य करणे, अशी अनेक समाजोपयोगी कामे अशोक गोडसे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केली. सर्वांच्या कायमस्वरुपी लक्षात राहणारे असे हे अशोकरावांचे कार्य आहे.

 

Leave a Reply