fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

आग्य्राहून सुटका स्मृतिदिनानिमित्त पुण्यात लाक्षणिक पालखी प्रस्थान थाटात

पुणे : जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा… शिवरायांच्या आग्य्राहून सुटका या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजिलेला पालखी सोहळा…ढोल-ताशांचा गजर…पुणेकरांनी पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त आयोजित लाक्षणिक पालखी सोहळा थाटात साजरा झाला.

छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुखरुप किल्ले राजगड येथे परतले, त्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५५ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ह्यकिल्ले राजगड उत्सवाह्णचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये लाल महाल येथे लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त माधव जगताप, राजगडाचे गडकरी सूर्यकांत भोसले, सौरभ कर्डे, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, मंडळाचे अध्यक्ष संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, समीर रुपदे, निखिलेश ठाकूर, शशी रसाळ, योगेंद्र भालेराव, रश्मी अनिल मते, आदी उपस्थित होते. यंदा उत्सवाचे ४१ वे वर्ष आहे.

ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, शिवरायांचे कार्यकतृत्व सर्वत्र पोहोचावे आणि तरुणांमध्ये याबाबत जागृती व्हावी, याकरीता प्रयत्न होणे गरजेचे आहे. राजगडाचा इतिहास फार मोठा आहे. शिवाजी महाराजांचे दिर्घ काळ वास्तव्य येथे होते. आज ३५० वर्षांनंतरही शिवराय सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक संकटाला तोंड देण्याचे उत्तर शिवचरित्रात आढळते, असेही त्यांनी सांगितले.

माधव जगताप म्हणाले, जगामध्ये शिवरायांची आग्य्राहून सुटकासारखी कोणतीही इतर घटना दिसून आलेली नाही. ही सुटका म्हणजे एक अभूतपूर्व आश्चर्य आहे. ती प्रेरणा आणि उर्जा घेऊन सर्वांनी काम करायला हवे. राजगड संवर्धन व छत्रपती शिवाजी महाराजांसाठी निगडीत कार्याकरीता पुणे मनपा नेहमीच पाठिशी राहिल.

वसंतराव प्रसादे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन १६६६ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस मागील ४० वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. आग्य्राहून सुटकेचा दिवस हा शिवरायांचा पुर्नजन्म होता. त्यामुळे यंदा देखील गडावर उत्सव साजरा होणार आहे. शनिवार, दि. ११ व रविवार, दि. १२ डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे गड जागरण, पोवाडा, व्याख्यान, सुर्योदयास ध्वजारोहण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी संपूर्ण उत्सवात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading