५० वर्षांवरील एकल विवाहेच्छूकांसाठी पहिल्यांदाच मोफत जीवनसाथी संमेलन
पुणे : गेल्या ३३ वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सिंधू सेवा दल या नामवंत सामाजिक संस्थेतर्फे ५० वर्षांवरील सर्व जाती-धर्मातील एकल महिला व पुरुषांसाठी मोफत जीवनसाथी संमेलन आयोजिले आहे. येत्या ३० जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील अल्पबचत भवन येथे ज्येष्ठांसाठी पहिल्यांदाच असा अनोखा विवाह मेळावा होत आहे, अशी माहिती देण्यासाठी सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष पीटर दलवानी व कार्यक्रमाचे संयोजक मनोहर फेरवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंधू सेवा दलाचे सचिव सचिन तलरेजा, निलेश फेरवानी, पीआरओ किरण फेरवानी, माजी अध्यक्ष व प्रवक्ता सुरेश जेठवानी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ५० वर्षांवरील विवाहेच्छूकांचा मेळावा होत आहे. सर्व जाती-धर्मांतील एकल महिला व पुरुषांना या मेळाव्यात सहभागी होऊन आपला जीवनसाथी निवडता येणार आहे. कोणत्याही जातीतील, धर्मातील किंवा राज्यातील अविवाहित, विधवा, विधुर लोकांना हा मेळावा खुला आहे. हा मेळावा पूर्णतः मोफत असणार आहे. आज समाजात एकट्या राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आज त्यांना जीवन व्यतीत करण्यासाठी एकमेकांची काळजी घेणाऱ्या जोडीदाराची गरज आहे. हीच गरज ओळखून संस्थेने हा ऐतिहासिक मेळावा भरवला आहे.
मनोहर फेरवानी म्हणाले, “अनुबंध फाउंडेशन या संस्थेकडून प्रेरणा घेत एकल ज्येष्ठांसाठी हा मेळावा घेत आहोत. अविवाहित ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या अवलंबितांकडून अत्यंत अवहेलना केली जाते आणि काळजी, प्रेम आणि साहवासाअभावी त्यांचे जीवन दयनीय बनते. यातून बाहेर पडत आनंदी जीवन जगण्यासाठी जोडीदार शोधण्याची संधी त्यांना देण्याचा प्रयत्न आहे.”
इच्छुकांनी संस्थेशी संपर्क करून विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत नाव नोंदवणाऱ्यांना या मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी वर्षा मोहनानी (९०४९४६४१५१), दिव्या मोहनानी (८९९९७१९०२४) यांच्याशी किंवा संस्थेच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन मनोहर फेरवानी यांनी केले.
