Mumbai : १५ मजली इमारतीला भीषण आग; २ महिलांचा मृत्यू

मुंबई : कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज भागातील गोल्ड शॉप इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या होत्या. रात्री साडेदहा वाजेपर्यंत आठ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीतील दोन जखमी झालेल्या रहिवासी महिलांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.

आग लागलेली इमारत पंधरा मजल्याची इमारत असून चौदाव्या मजल्यावर ही आग लागली होती. दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतला त्यातून ही आग वाढत गेली अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. या आगीतील दोन मृत महिलांपैकी एक ८९ वर्षांची आहे, तर दुसरी ४५ वर्षांची आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आगीबाबत सद्यस्थितीची माहितीही अग्निशमन दल अधिकाऱ्यांकडून घेतली. ही आग सध्या नियंत्रणात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: