Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोहित कंबोज हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा सदस्य आणि क्रूझ प्रकरणाचा मास्टरमाईंड

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याला अडकवण्यात आलं असून हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मोहित कंबोज हा मास्टरमाईंड असल्याचा दावा करत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा तो सदस्य असल्याचा आरोप केला आहे. 

नवाब मलिक म्हणाले, आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

नवाब मलिक यांनी पुढे म्हटलं, 1100 कोटींचा बॅंक घोटाळा मोहित कंबोज (भारतीय) या व्यक्तीने केला आहे. देशात सत्ता बदलताच मोहित भारतीय याने भाजपत प्रवेश केला. पैशांच्या जोरावर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला. दीड वर्षांपूर्वी इडीची रेड झाली मात्र हे प्रकरण दाबले गेले. मोहित कंबोज याचे मुंबईत 12 हॉटेल्स आहेत. आपले हॉटेल्स चालवण्यासाठी समीर वानखेडे याच्याकडून इतर स्पर्धक हॉटेल्सला धमकावलं जातं. ड्रग्स माफीयांकडून पैसे उकळण्याचा यांचा उद्देश आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, आम्ही सांगितलं होतं की मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांचे संबंध आहेत, लवकरच यांच्या मिटिंगचे व्हिडीओ प्रसिद्ध करु. नशिब यांचे चांगले आहेत. एका कब्रस्थान संदर्भात वानखेडे साहेब बोलत होते की, कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहेत. माझी 6 ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाली. त्यानंतर 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांची कब्रस्थानाच्या बाहेर भेट झाली. आम्ही पाहत होतो की, तेथील सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागेल. तेथील नागरिकांनी मला माहिती दिली की, एक गाडी आली होती त्यात काही बॉडिगार्ड्स होते. एक दाढीवाला व्यक्ती त्यांना भेटला होता. यांचे नशीब चांगले आहेत पोलिसांचा त्या परिसरातील सीसीटीव्ही बंद होता त्यामुळे त्या मिटिंगचा सीसीटीव्ही व्हिडीओ आम्हाला मिळाला नाही असं नवाब मलिक म्हणाले.

समीर वानखेडे घाबरले आणि ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले की कुणीतरी माझा पाठलाग करत आहे. प्रायव्हेट आर्मीचा कंबोज हा सुद्धा एक प्लेअर आहे. समीर वानखेडेंचा एकच धंदा आहे शहरात ड्रग्जचा कारोबार सर्रास सुरू राहिला पाहिजे. ड्रग्ज प्रकरणातील माफियांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल. ड्रग्स माफीयांकडून पैसे उकळण्याचा यांचा उद्देश आहे असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading