Wednesday, July 29, 2026
Latest NewsSports

ज्येष्ठ क्रिकेट मार्गदर्शक अरविंद शिवले यांना जीवनगौरव प्रदान

पुणे : ४० वर्षांपेक्षा अधिक काळ क्रिकेटमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करुन, विभागीय, आंतरविद्यापीठ, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविणारे…१९७५-७६ साली आपल्या कर्णधारपदाखाली नेस वाडीया महाविद्यालयाला प्रथम डेव्हिड कप मिळवून देणारे ज्येष्ठ क्रिकेट मार्गदर्शक अरविंद शिवले यांना त्यांच्या समृद्ध कारकि‍र्दीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते शिवले यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला.

नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय पुणे आणि नेस वाडिया महाविद्यालयाचे माजी क्रिकेट खेळाडू यांच्यावतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी रियाज बागवान, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. मनोहर सानप, माजी क्रिकेटपटू निकी सलढाणा, अनिता शिवले, नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य वृषाली रणधीर, उपप्राचार्य प्रकाश चौधरी यावेळी उपस्थित होते. राजू कोतवाल, मंगेश भुस्कुटे, राहुल ढोलेपाटील, संजय झरेकर, संदेश महाडिक, श्रीकांत जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले,

अरविंद शिवले म्हणाले, नेस वाडिया महाविद्यालयाने ख-या अर्थाने मला घडविले. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळाडूंना तयार करु शकलो. यापुढेही खेळाडूंना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देण्यासाठी सदैव तत्पर असेल.

चंदू बोर्डे म्हणाले, अरविंद शिवले यांनी अनेक वर्षे क्रिकेटचे मार्गदर्शन केले, क्रिकेटची सेवा केली, त्यामुळे उत्कृष्ट क्रिकेटर्स तयार झाले. चांगले मार्गदर्शन करणाऱ्या गुरुला शिष्य कधीही विसरत नाही, यांचे उत्तम उदाहरण अरविंद शिवले आहेत.

क्रिकेटचे आता व्यावसायिकीकरण झाले आहे. पूर्वी कामगिरी चांगली असेल तरच स्पर्धांसाठी निवड होत असे. परंतु क्रिकेटमध्ये व्यावसायिकीकरण आले, त्याचप्रमाणे चांगल्या सुविधाही मिळत आहेत, हे कौतुकास्पद आहे. सध्या खेळांमध्येदेखील राजकारण येत आहे. परंतु खेळाडूंनी केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करायला हवे नाहीतर, खेळाडूंचे नुकसान होते. दीपिका आणि रणवीर हे देखील आता आयपीएलमध्ये उतरत आहेत. त्यामुळे हे क्रिकेट आहे की बॉलीवूड हा प्रश्न निर्माण होतो. क्रिकेट हा खेळ सर्व्हिस ओरिएन्टेड झाला आहे. क्रिकेटची फार मोठी इण्डस्ट्री झाली असून ती पुढे वाढत जाणार आहे. देशात क्रीडा क्षेत्र बदलत आहे त्यामुळे क्रीडापटूंचे भविष्य उज्ज्वल आहे केवळ क्रिकेटच नाही, तर इतरही खेळ खेळून चांगल्या सुविधा खेळाडूंना मिळत आहेत,असेही त्यांनी सांगितले.

कुशाबा पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश भुस्कुटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मिथुन त्रिभुवन यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading