पुस्तक ही माणूसपणाची खूण – डॉ. सदानंद मोरे

भिलार  : पुस्तक ही माणूसपणाची अत्यंत महत्त्वाची खूण असून माणूस आणि पशू यांमधील ज्ञानाच्या हस्तांतरणातील फरक स्पष्ट करणारा प्रमुख घटक आहे, हा मूलभूत विचार डॉ. सदानंद मोरे यांनी पुस्तकांच्या गावाच्या वतीने योजलेल्या आभासी व्याख्यानात मांडला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पाच्या वतीने ‘आभासी अभिवाचन आणि व्याख्यानाचा’ कार्यक्रम योजण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. मोरे यांनी ‘मानवसंस्कृती ही एका अर्थाने वाचनसंस्कृतीच’ आहे, असे ठाम प्रतिपादन केले.

पुस्तकांच्या निर्मितीचा इतिहास, पुस्तकांचे प्रकार इत्यादी मुद्यांचा आढावा घेत, डॉ. मोरे यांनी विभ्रंशावर (अॅम्नेशियावर) मात करण्यासाठी आणि मानवी अस्मितेच्या सार्थ जाणीवेसाठी पुस्तकं व वाचन संस्कृती हे घटक अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन व पुस्तकं केंद्रबिंदू मानून घराचे आरेखन आणि बांधकाम केले होते, हे पुस्तकप्रेमाचे उच्च कोटीतले उदाहरण देऊन, डॉ. मोरे यांनी ‘पुस्तकं विकत घ्या आणि वाचा’, असे कळकळीचे आवाहनही उपस्थितांना केले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी त्यांचे सार्थ स्मरण करण्यासाठी योजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतील १३ अभिवाचकांनी सादरीकरण केले. राजेश जाधव,  विनायक बगाडे, सुहास करपे, डॉ. देवीदास वायदंडे,  अभिजित भिसे,  प्रसाद सोमण,  रुपाली पाटील, प्रा. सायली आचार्य,  मंजुषा भिडे,  संपत कदम,  विवेक कवठेकर,  सचिन वीर,  अमेय धोपटकर  या अभिवाचकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भिलार गावातील ज्येष्ठ गावकऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच  सुनीता भिलारे यांच्यासह तेजस्विनी भिलारे,  शशिकांत भिलारे, राजेंद्र भिलारे, नितीन भिलारे, तानाजी भिलारे आदी दालनचालकही उपस्थित होते.

खुद्द भिलार गावासह महाराष्ट्रातील विविध भागांतील सुमारे ४५० श्रोत्यांनी अभिवाचन आणि व्याख्यानाचा आनंद घेतला. मु. सा. काकडे महाविद्यालय (सोमेश्वर, बारामती, पुणे) आणि जे. सी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (कारंजे लाड, वाशिम) या संस्थांमधील विद्यार्थी-शिक्षक-प्राध्यापक या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्प व्यवस्थापक विनय मावळणकर यांनी डॉ. सदानंद मोरे यांच्यासह अभिवाचकांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले. तसेच पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: