चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांचा समावेश

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांना आमंत्रित करण्यात आले असून स्पर्धेला 16  ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजयकुमार ताम्हाणे,  पीवायसी हिंदू जिमखानाचे सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पुना क्लब, डेक्कन जिमखाना, केडन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, आर्यन्स क्रिकेट अकादमी, 22 यार्डस, ब्रिलियंट क्रिकेट अकादमी  हे 10 संघ झुंजणार आहेत. या स्पर्धेतील सामने पीवायसी हिंदू जिमखाना, व्हेरॉक, लोणी मैदान, ब्रिलियंटस क्रिकेट अकादमी व पुना क्लब येथील मैदानावर होणार आहे. यावेळी पत्रकारपरिषदेत क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, टी एन सुंदर आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल छाजेड यांनी सांगितले की, या स्पर्धेला प्रायोजित करून आम्हांला आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता व कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड पुढे म्हणाले की, ही स्पर्धा बाद पध्दतीने होणार आहे. आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कुचबिहार 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेला अनुसरून या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना सराव व्हावा या अनुषंगाने या स्पर्धेतील सामने तीन दिवसीय क्रिकेट सामने खेळविण्यात येणार आहेत. बाद फेरीतील विजेते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या संघाला राजू भालेकर स्मृती करंडक देण्यात येणार  आहे. याशिवाय सामनावीर यासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि मालिकावीर यांनादेखील करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा व अंतिम सामना पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, पराग शहाणे, इंद्रजीत कामतेकर, सारंग लागू, दिपक गाडगीळ, कपिल खरे यांचा सहभाग आहे

Leave a Reply

%d bloggers like this: