‘पुण्यकथा’ मधून उलगडणार दक्षलक्ष वर्षांपासूनची पुण्याची गोष्ट
पुणे : आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच तो गोष्टीरुपात तरुण व नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने पुण्यातील मंजिरी खांडेकर यांच्या संकल्पनेमधून ‘पुण्यकथा’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. हेरिटेज इंडिया या संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून या संबंधीची माहिती खांडेकर यांनी आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
‘पुण्यकथा’ या पुस्तकाचे मार्गदर्शक, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती व पुरातत्व संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, हेररिटेज इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजिरी खांडेकर, पुण्यकथा या पुस्तकाच्या लेखिका कल्याणी सरदेसाई, पुस्तकातील विषयाच्या संदर्भात संशोधनासाठी विशेष मदत केलेले प्रो. प्र के घाणेकर, डॉ. अजित वामन आपटे, पुस्तकाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर तेजस मोडक, पुस्तकातील आर्टवर्क ज्यांची आहेत त्यांपैकी अनंत देरे, आर्ट पुणे फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थिती होते.
या वेळी बोलताना डॉ. देगलूरकर म्हणाले, “आज किती जणांना इतिहास हा विषय आवडतो हा खरा प्रश्न आहे. मात्र इतिहासाची माहिती असल्याशिवाय इतिहास निर्माण करता येत नाही हे ही तितकेच खरे. आपल्या पुण्याच्या दक्षलक्ष वर्षांपासूनच्या गौरवशाली इतिहासाची माहिती जास्तीत जास्त वाचकांना व्हावी, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. वाचनीय, देखण्या आणि प्रबोधनपर गोष्टींच्या माध्यमातून आम्ही हा इतिहास मांडला आहे. शासकीय यंत्रणेतून आलेल्या माहितीखेरीज अधिकची माहिती रंजक पद्धतीने देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. प्रागैतिहासिक काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंतची सफर हे पुस्तक घडविते. पुण्याशी संबंधित इतिहासातील सर्व भागांचे कांगोरे या पुस्तकात आले असल्याचा आम्हाला आनंद आहे.”
मंजिरी खांडेकर म्हणाल्या, “कोणतेही शहर हे केवळ मानवी वस्तीचे स्थान नाही तर त्या ठिकाणी विस्तारणा-या संस्कृतीच्या प्रगतीचे भावविश्व असते. आपल्या याच भावविश्वाची माहिती तरुण व नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हेररिटेज इंडियाच्या माध्यमातून आम्ही ‘पुण्यकथा’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. आजच्या अस्थिरतेच्या काळात नागरिकांना आपल्या संस्कृतीची, इतिहासाची माहिती व्हावी, त्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी आणि आपल्या शहराचा ऐतिहासिक, संपन्न व समृद्ध इतिहास त्यांच्या समोर यावा, हा हे पुस्तक बनविण्यामागील हेतू आहे.”
