दुर्गम भागातील गावांना धबधब्यांपासून मिळणार ‘शाश्वत ऊर्जा’..
पुणे: जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावे ही आजही अंधारात आहेत. ज्या ठिकाणी वीज आहे, त्या ठिकाणी वीजपुरवठा नियमित होत नाही. कधी लोड शेडिंग तर कधी पावसामुळे अचानक दोन-तीन दिवस खंडित होणारा वीजपुरवठा. भोर, वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात विजेचा लंपडाव हा पाचवीलाच पुजला आहे. मात्र, अशा दुर्गम भागांतील गावांना ऊर्जेबाबात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काही ध्येयवेड्या तरुणांनी ‘मिशन ऊर्जा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे वेल्हा, भोर तालुक्यांतील दुर्गम भागातील गावांना भेडसावणारी ही समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे ‘स्वदेश या चित्रपटापासून प्रेरित होत पावसाळ्यात धबधब्याचे पाणी साठवून त्यावरून वीजनिर्मिती केली जाणार आहे. कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांच्या सहभागातून सहा गावांमध्ये ‘मिशन ऊर्जा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. पुढील पावसाळ्यात गावकऱ्यांना शाश्वत उर्जेचा प्रकाश मिळणार आहे. भोर, वेल्हा तालुक्यांतील ६ व सातारा जिल्ह्यातील ४ गावे येत्या वर्षात स्वतः तयार केलेल्या विजेने उजळून निघणार आहेत.
धबधब्याचे पाणी एका साठवण तलावात साठवून या पाण्यावर सात ते आठ महिने वीजनिर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पातून वर्षभरात १६ ते २२ हजार किलोवॅट वीजनिर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. प्रकल्पाचा शास्त्रीय अभ्यास, तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रशासकीय परवानगी देखील मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या सहभागातून या महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. वेल्हे तालुक्यातील घेवंडे, गेळगाणी,धोपेखिंड ही गावे तर चांदवणे या भोर तालुक्यातील गावात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
वेल्हा तालुक्यातील घेवंडे गावामध्ये मिशन ऊर्जा या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर सरपाले, सर्व गावांतील सरपंच, लोकप्रतिनिधी, ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन, किर्लोस्कर ब्रदर्स, इमरीस इंडिया, रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नैसर्गिकदृष्ट्या आणि सह्याद्रीच्या डोंगररांगामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे पाणी वाहून जात धरणात मिसळते. याच पाण्याचा वापर करून, पुण्यात अभियंते असलेल्या तरुणांचा एक समूह ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून छोटा वीजप्रकल्प उभारणार आहेत. यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी, पर्सिस्टंट फाउंडेशन, इमरीस इंडिया आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोने सहकार्य केले आहे.
