मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू, मात्र ‘या’ कारणांमुळे थंडी लांबणीवर
पुणे: ऐन ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्या सारखी परिस्थिती असली तरी आता मान्सूने देशासह राज्यातील अनेक भागातून काढता पाय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आता थंडी अनुभवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. वास्तविक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू व्हायला हवा होता. मात्र त्याला आता पंधरा दिवस उशीर झाला आहे. त्यातच आता पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाली पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान बादळासाठी काही काळ जावून मग त्यानंतर थंडीची चाहूल लागेल असा अंदाज आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने घेतला काढता पाय
राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. सोमवारी (ता. ११) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
देशातील मॉन्सूनचा परतीचा प्रवास
बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारी (ता. ८) वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला. सोमवारी (ता. ११) संपूर्ण झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागासह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे.
परतीची सीमा सिलीगुडी, मालदा, शांतीनिकेतन, मिदनापूर, बारीपाडा, चिंचवाडा, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदर होती. देशाच्या आणखी काही भागातून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा बहुतांश भाग, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशाचा आणखी काही भाग, तसेच ईशान्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
