पतित पावन संघटना पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविणार
पुणे : गेल्या काही वर्षात पुण्याचा विकास थंडावलेला आहे. ज्या पद्धतीने देशातील इतर शहरे विकसित होत आहेत, त्या तुलनेत पुणे शहर मागे पडले आहे. आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या पक्षाला पाठिंबा दिला, तो पक्ष पुण्यात हिंदुत्वाच्या बाबतीत बोटचेपेपणाची भूमिका घेत आहे. त्यामुळे पतित पावन संघटना पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला संघटनेचे राजाभाऊ पाटील, शिवाजीराव चव्हाण, श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, स्वप्नील नाईक आदी उपस्थित होते.
स्वप्निल नाईक म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्यावर ज्या पक्षाला संघटनेने पाठिंबा दिला, त्या पक्षाच्या शहर पातळीवरील नेत्यांना हिंदुत्वाशी काही देणे घेणे नाही. केवळ व्यावसायिक हितसंबंध जपण्यात ते मश्गुल झाले आहेत. पुणे शहरातील सर्वपक्षीय प्रतिनिधी हे लोक प्रतिनिधी नसून फक्त ठेकेदारांचे प्रतिनिधी आहेत, ही आजची परिस्थिती आहे. खरोखर जे पुणेकरांना हवे आहे, ते काम न करता अनावश्यक कामे करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर पुणे मनपा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेसह जिथे जिथे संघटनेची ताकद आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील संघटना लढविणार आहे. आजपर्यंत अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढणारी पतित पावन संघटना ही ओळख सर्वदूर होती. आता राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे लोकसेवेत कार्य करण्याकरीता संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उतरणार आहेत. संघटनेची पुढील दिशा विस्तृतपणे लवकरच पुणेकरांसमोर मांडण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
