पुणे : कोविडच्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होवू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण डॉक्टर्स, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र केलेले काम हे आहे. परंतु त्यासोबतच कोविडविषयी समाजाच्या तळागाळात जनजागृती होणे देखील गरजेचे होते. ती जनजागृती करण्याचे मोठे कार्य सामाजिक संस्थांनी केले आहे, असे मत आयएमए चे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवात कर्तृत्ववान महिलांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. राजू चमेडिया, नरेश जालन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
कोविड काळात नायडू रुग्णालयात काम केलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधलेल्या परिचारिका छाया जगताप तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनिया अग्रवाल-कोंजेटी, पल्लवी जैन यांचा गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, साडी, शाल असे सन्मानाचे स्वरुप होते. डॉ.अविनाश भोंडवे यांनी देवीची सपत्नीक आरती देखील केली.
डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले, मनुष्य हा सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. भाविकता आणि भावूकता हे गुण त्याच्यामध्ये आहेत. हे दोन्ही गुण जागृत करण्याकरीता प्रत्येकाच्या पाठिमागे आई व स्त्री असते. त्यामुळे नवरात्रीमध्ये मातेचा जागर केला जातो. कोविड काळातील आरोग्य तपासण्या अनेकांना न परवडणा-या होत्या. त्यांना परवडणा-या दरात सेवा देण्याचे कार्य देखील महिलांनी विविध संस्थांच्या माध्यमातून केले आहे.
अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिव ठेवून ट्रस्टचे कार्य सुरु आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. याशिवाय उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये सुरु आहेत. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना मदत करण्याकरीता उत्सवातील निधी वापरण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट
www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन पूजा संकल्प तसेच फेसबुक पेज व युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Related