fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

नवजात बाळांच्या श्र्वसन विकारावर उपचारांसाठी उपकरणांची खरेदी

पुणे :  महापालिकेच्या प्रसुतिगृहांमध्ये जन्माला येणार्या नवजात बाळांच्या श्वसन विकारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणार्या उपकराणांची खरेदी करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘पुणे महापालिकेच्या प्रसुतिगृहांमध्ये दररोज जन्माला येणार्या बाळांपैकी सरासरी दहा बाळांना जन्मत:च श्र्वास घेण्यास त्रास होतो. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने बाळाच्या मेंदूवर दुष्पपरिणाम होतो किंवा काही बाळांना प्राण गमवावा लागतो. हा धोका टाळण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये किमतीची सात नवीन उपकरणे खरेदी करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली.’

रासने पुढे म्हणाले, ‘शिवाजीनगरमधील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोविड पॉझिटिव्ह नवजात अर्भकांवर उपचार करण्यासाठीही ती उपयुक्त ठरणार आहेत.’

घनकचरा व्यवस्थपनासाठी संगणक प्रणाली

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दैनंदिन कामकाज सुरळीत करण्यासाठी विकसित करण्यात येणार्या संगणक प्रणालीसाठी सुमारे १८ कोटी ५८ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील झाडणकाम, घरोघरी जाऊन कचरा संकलन, कचरा वाहतुकीचे व्यवस्थापन, कचर्यावर प्रक्रिया, शास्त्रोक्त भूळराव प्रकल्प, विविध प्रकारच्या कचर्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक व व्यावसायिक शौचालये आदींच्या कामामध्ये या संगणक प्रणालीमुळे सुसूत्रता येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील हजेरी, करार, बिलिंग, जीपीएस सिस्टिम, आरएफआयडी, स्मार्ट वॉचेस यासाठी आवश्यक मॉड्यूल आणि आवश्यक असणारे हार्डवेअर पुरविण्यात येणार आहेत.

रासने पुढे म्हणाले, ‘या प्रणालीसाठी सुमारे ११ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी स्मार्ट सिटी उपलब्ध करून देणार असून, पंधराव्या वित्तीय आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून सुमारे ६ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीमधून औंध बाणेर बालेवाडीमधील यंत्रणेसाठी आवश्यक सर्व हार्डवेअर, संपूर्ण शहरासाठी सॉफ्टवेअर, मोबार्इल अप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे.’

बारटक्के रुग्णालयात डायलेसिस केंद्र

वारजे येथील पुणे महापालिकेच्या अरविंद गणपत बारटक्के रुग्णालयात नेप्रोकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने डायलेसिस केंद्र सुरू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आप पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘शहरातील मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किडनीचे आजार वाढत असून, त्याचा परिणाम रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होण्यात होतो. या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागतात. हे उपचार महागडे असतात. ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे बारटक्के रुग्णालयात डायलेसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति डायलेसिस ३७८ रुपये दर असणार्या निविदेला मान्यता देण्यात आली.’

कल्याणीनगर स्टेशनसाठी जागा उपलब्ध

कल्याणीनगर येरवडा टी. पी. स्किम येथील जागा पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या कल्याणीनगर स्टेशनसाठी वाहनतळ, प्रवाशांना प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘एकूण ३९७.९७ चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची सध्याच्या रेडिरेकनरनुसार किंमत २ कोटी ३ लाख रुपये इतकी होते. ही जागा महामेट्रोला नाममात्र एक रुपये भाड्याने ३० वर्षांच्या कराराने देण्यात आली आहे.

संरक्षण विभागासाठी ड्वेलिंग युनिटच्या बांधकामासाठी मान्यता

चांदणी चौकातील बहुउद्देशिय वाहतूक प्रकल्पासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ताब्यातील ०.४८ हेक्टर रस्त्याच्या जागेच्या सुमारे १६ कोटी ८८ लाख रुपयांच्या मोबदल्यापैकी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी पुणे महापालिकेकडे दिलेल्या सुमारे १६ कोटी ४० लाख इतक्या अनामत रकमेतून संरक्षण विभागासाठी ड्वेलिंग युनिटचे बांधकाम करणे आणि सल्लागाराला २ टक्के शुल्क देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading