गणेशोत्सवाने स्वराज्याची प्रेरणा देत केले राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य -डॉ.सदानंद मोरे
पुणे : ब्रिटीश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ते ठराविक भागापुरते मर्यादित होते. स्वातंत्र चळवळ उभी करताना उत्सवाचा उपयोग करता येईल, ही कल्पना त्यांना सुचली आणि गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले. याच गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा सामान्यांना मिळाली असून राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पार्वती चव्हाण सोशल फाऊंडेशन आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ यांच्या तर्फे बाजीराव रस्त्यावरील वरदश्री सभागृह येथे विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, निवृत्त पोलीस अधिकारी मारुतीराव देशमुख, फाऊंडेशनचे संस्थापक गणेश चव्हाण, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शाह, नितीन यंदे, अमर राव, भोला वांजळे, नरेंद्र व्यास आदी उपस्थित होते.
गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्थिर पाण्याचे हौद तसेच फिरत्या हौदांची तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणा-या आठ गणेशोत्सव मंडळांना विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, वाघजाई मित्र मंडळ फाऊंडेशन जनता वसाहत, हिंदमाता तरूण मंडळ नाना पेठ, देशप्रेमी मित्र मंडळ कोथरूड, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, श्री रास्ता पेठ सार्वजनिक नायडू गणपती मंडळ, वंदे मातरम् मित्र मंडळ कसबा पेठ आणि गवळीवाडा श्री अरण्येश्वर मित्र मंडळ सहकार नगर या मंडळांचा उपरणे, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, गणपतीची उपासना आणि विद्या व कलेची जोपासना गणेशोत्सवाने केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत विद्या व कलेची जोपासना या उत्सवात झालेली दिसून येते. यामुळे आपल्याला उत्तम ज्ञान मिळत आहे. याशिवाय समाजसेवा देखील गणेश मंडळाच्या माध्यमातून आज होत असून ही कौतुकाची बाब आहे.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, गणेशोत्सवाचा प्रत्येक कार्यकर्ता ही एक संस्था आहे. गणेश मंडळे ही सामाजिक कार्यकर्ते निर्माण करणारी कार्यशाळा आहे. कोविड काळात राष्ट्र, समाज व संस्कृतीविषयी आत्मियता सर्व मंडळे व कार्यकर्त्यांनी दाखविली आहे. त्यामुळे पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे आकर्षण आहे, असेही त्यांनी सांगितले.
