Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा -चंद्रकांत पाटील

पुणे:कोथरूड मतदारसंघातील हॅप्पी कॉलनी- गोसावी वस्तीतील नागरिकांना काही समाजकंटकांच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्याची मागणी स्थानिकांकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर पाटील यांनी याचा पाठपुरावा सुरू केला.

यासंदर्भात आयुक्त अमिताभ गुप्ता आणि उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासोबत बैठक घेऊन, तोडगा काढण्याची मागणी केली होती. तसेच सदर ठिकाणी पोलीस चौकी उभारुन, येथील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती. याशिवाय सदर पोलीस कर्मचाऱ्यांना लोकसहभागातून वेतन देण्याची तरतूद करु, असेही पाटील यांनी आयुक्तांना आश्वास्त केले होते.चंद्रकांतदादांच्या आग्रही मागणीमुळे सदर ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात आली असून, याचे लोकार्पण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी झाले.

या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पवार, अलंकार पोलीस चौकीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात माननीय देवेंद्रजींनी पोलीस सक्षमीकरणावर भर दिला. यासाठी पोलीस विभागातील बदल्यांसाठी कोणीही येऊ नये, असा आग्रह धरला. त्यांच्या मते पोलिसांना त्यांच्या गुणवत्तेनुसारच पोस्टिंग मिळावे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मंडळ स्थापन करुन गुणवत्तेनुसार पोलीस बदल्या केल्या. त्यामुळे भाजपा सरकारच्या काळात पोलिसांच्या कामात हस्तक्षेप होत नव्हता. म्हणूनच भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा सर्वत्र दबदबा होता.

ते पुढे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी हे हिंदू संस्कृतीचे पाईक आहेत. हिंदू संस्कृतीत एकमेकांना मदत करण्याची शिकवण दिली जाते. हिंदू म्हणजे प्रेम, आपुलकी, दुसऱ्याला मोठं करण्यात आनंद मानणं आहे.”

अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या की, “ज्याप्रमाणे कोथरूड पोलीस चौकीचे काम पाहात असताना इथल्या नागरिकांना शंभर टक्के न्याय दिला, त्याप्रमाणे अलंकार पोलीस चौकीच्या हद्दीतील नागरिकांना ही न्याय देणार. त्यामुळे नागरिकांना कधीही कोणतीही अडचण आल्यास त्यांनी तात्काळ मला संपर्क साधावा, त्यांना लगेच मदत मिळेल.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. अनुराधा एडके यांनी केले. प्रभाग क्रमांक १३ चे अध्यक्ष राजू येडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading