Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह उर्वरीत राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

पुणे: राज्यात अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. येत्या १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक तर विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह उर्वरीत राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागील काही दिवसांपासून घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने नाशिक, साताऱ्यासह धुळे, नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत २०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, विदर्भातील बुलडाणा, घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने नाशिक, साताऱ्यासह धुळे, नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत २०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोले, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये आठवडाभरात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच उणे ८९ टक्के पाऊस पडला. तसेच बीड जिल्ह्यात उणे ८१ टक्के, जालना उणे ७७ टक्के, उस्मानाबाद उणे ७७ टक्के, औरंगाबाद उणे ३२ टक्के, तर नांदेड जिल्ह्यात उणे २० टक्के पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उणे ४६ तर नगर जिल्ह्यात उणे ३५ टक्के पाऊस पडला. वाशीम, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान राज्यातील कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात चारही विभागांमध्ये सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाच्या उघडीपीमुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा २८ ते ३४ अंश, तर किमान तापमान २० ते २४ अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading