गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी  पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.

रुपाणी पत्रकार परिषदे आधी राज्यपालांना भेटले. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

पत्रकार परिषदेत बोलताना रूपाणी म्हणाले की,  ‘पक्षामध्ये वेळोनुसार जबाबदाऱ्या बदलत असतात. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. गुजरात विधानसभेच्या पुढील वर्षी निवडणूका आहेत. या निवडणूकादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लढण्यात येतील. 

नितीन पटेल होणार मुख्यमंत्री?

रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: