पुण्यातील अनिरुद्ध देशपांडे यांचा अमेरिकेतील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने लिडिंग डायरेक्टर पुरस्कार २०२१ ने सन्मान  

पुणे  : धोरणात्मक प्रयोगांच्या उभारणी बरोबरच नाविन्यपूर्ण विचाराने संस्थेला पुढे नेणारे यशस्वी नेतृत्व म्हणून पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचा नुकताच अमेरिकेतील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार २०२१’ प्रदान करीत सन्मान करण्यात आला.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व सध्याचे लोकसभेचे खासदार डॉ. फारुक अब्दुल्ला यांच्या हस्ते जम्मू – काश्मीरमधील सोनमार्ग येथे झालेल्या एका कार्यक्रमात सदर पुरस्कार देशपांडे यांना प्रदान करण्यात आला.

ग्रीनटेक फाउंडेशन ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया व भारतातील नवी दिल्ली स्थित सामाजिक संस्था असून १९९९ साली तिची स्थापना झाली आहे. व्यावसायिक जगतात पर्यावरण, सुरक्षा, सामाजिक उत्तरदायित्व, मानव संसाधन व सामाजिक आर्थिक क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची छाप उमटविणा-या व्यक्तींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात येत असतो. यावर्षी नाविन्यपूर्ण कल्पनांची कास धरत प्रभावी विकास करणारे व भविष्याचा विचार करीत कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून फाउंडेशनच्या वतीने देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.

पुण्यातील अमनोरा टाउनशिप या पहिल्या स्मार्ट सिटीचा यशस्वी विकास करणारे अनिरुद्ध देशपांडे हे सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच कार्यरत असून सामाजिक भावनेने त्यांनी खामगाव येथे आदिवासी व फासे पारधी समाजाच्या ८०० मुलांसाठी वसतीगृहाची उभारणी केली आहे. याबरोबरच शेतकरी, महिला व लहान मुलांबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील नागरिकांसाठी देखील त्यांच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आजवर तब्बल ३०० हून अधिक पुरस्कारांनी अमनोराचा तर २० हून अधिक पुरस्कारांनी देशपांडे यांचा विविध संस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला असून यामध्ये पर्यावरण व सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. कोरोना काळात एका खाजगी स्थानिक मालमत्तेप्रमाणे राबविण्यात आलेले अमनोरामधील नाविन्यपूर्ण व्यवस्थापन यांमुळे अनिरुद्ध देशपांडे यांची कामाप्रती निष्ठा आणि त्यांची कौशल्ये दर्शविणारी ठरली, हीच बाब निवड समितीच्या सर्वांना भावली.

Leave a Reply

%d bloggers like this: