राजकीय पक्षाचे आंदोलन चालते तर मग नाट्यगृहे का बंद? अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके यांचा सरकारला सवाल

कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या वतीने कलाकारांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे : राजकीय संघटनाची आंदोलने होतात, मंडईत गर्दी आहे, लग्नाचा हॉल भरगच्च भरलेला असतो, त्यावेळी कोणतेही शारीरिक अंतर न ठेवता विना मास्क सर्वजण फिरताना दिसतात. मात्र सरकारी नियमांचे पालन करून नाटक, सिनेमागृह सुरू करायचे म्हटले तर सरकारला कोरोना आडवा येतो. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सिनेमा आणि नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपला आहे, आता तरी नाट्यगृहे आणि सिनेमागृहे सुरू करण्यात यावी, अशी मागणी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके यांनी केली आहे. कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या वतीने छोट्या भूमिका करणारे कलाकार, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ अशा कलाकारांना अन्नधान्य किट आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सिंहगड रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जयवंतराव जाधव, निशा पाटील, रमेश अगावणे, डॉ श्रीकांत धुमाळ,अंजली माने, इंदिरा अहिरे, नितिन वाघ, रवी तुपारे,रामचंद्र पोळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सामजिक कार्यकर्त्या दिपाली कोठारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी बोलताना कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा वैशाली पाटील म्हणाल्या की, कलाकारांचे काम थांबले असले तरी आपण सर्वांनी मदत करून त्यांच्यातील कलाकार मात्र जिवंत ठेवला पाहिजे. ज्या कलाकारांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही, त्यांना मदत देण्यासाठी समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आयोजन वैशाली पाटील यांनी तर सूत्रसंचालन सचिन पासलकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: