व्हिडिओकॉनची ५ हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : बँकांकडून घेतलेली कर्जे थकल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि दिवाळखोरीत निघालेल्या व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजची मालमत्ता जप्त करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. त्यानुसार, व्हिडिओकॉनच्या ५ हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या मालमत्तेची यादी तयार करण्यात आली असून तिच्या जप्तीची कारवाई लवकरच केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजने बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्जे घेतली. मात्र आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळ्यामुळे हा उद्योग समूह आर्थिक अडचणीत सापडला. यामुळे बँकांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकली आहेत. त्यांची वसुली करण्यासाठी या उद्योग समूहाची मालमत्ता जप्त करून ती विकण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. त्यानुसार व्हिडिओकॉनच्या मालमत्तेची यादी तयार केली जात आहे. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीची दिवाळखोरी हे देशातील सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक प्रकरण आहे. यात बँकांच्या थकीत कर्जाची वसुली केवळ ४.१५ टक्के होणार आहे. त्यामुळे ही कर्ज वसुली जास्तीत जास्त करण्याच्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्हिडिओकॉन उद्योग समूहाची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. त्यासाठी एमसीएने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अर्ज केला आहे. त्यावर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये कंपनीविरोधात दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली. या उद्योग समूहाकडे ७१,४३३.७५ कोटींची कर्ज थकबाकी आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ६४,८४८.६३ कोटींचे दावे स्वीकारलेले आहेत. व्हिडिओकॉनला कर्ज देणाऱ्या बँकांनी कंपनीची मालमत्ता जप्त करून कर्जवसुलीसाठी परवानगीची मागणी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: