fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एमएमआरडीए मैदान, वांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. वायुवेग पथकाच्या माध्यमातून वेगवान आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करता येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले त्याप्रमाणे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. याला आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली असून या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल स्थानी असल्याचा अभिमान आहे. परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याने या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईल. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, देशातील रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेली आहेत. गेल्या वर्षभरात दुर्दैवाने महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असलेली 76 वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतूक नियंत्रणात येईल. भविष्यात महाराष्ट्र अपघात रोखण्यात यश मिळेल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्यासाठीही वाहनांचा उपयोग होईल, असेही परब यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading